गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंना धक्का; उपोषणाला पोलिसांचा नकार

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Jarange denied permission for hunger strike मनोज जरांगे पाटील यांच्या १९ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर नियोजित उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. आंदोलनादरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन केले जाईल, असे आश्वासन देत त्यांनी हमीपत्रही सादर केले होते. मात्र, आझाद मैदान पोलीस ठाण्याने त्यांचा अर्ज फेटाळला आहे.दक्षिण मुंबईतील दैनंदिन व्यवहारांवर या आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायालयीन कामकाज, सार्वजनिक वाहतूक आणि सार्वजनिक आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर परिणाम होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे आझाद मैदान येथे आमरण उपोषण आणि आंदोलनासाठी मागण्यात आलेली परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन न करण्याबाबत पोलिसांकडून नोटीस बजावली जाणार आहे.
 
 

jarange 
 
यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी मुंबईतील परिस्थितीचा दाखलाही पोलिसांनी दिला आहे. त्या वेळी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर उतरल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सीएसएमटी परिसर तसेच महानगरपालिका मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. परिणामी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. मागील आंदोलनावेळी मुंबई पोलिसांनी काही अटी-शर्तींसह परवानगी दिली होती. त्यावेळी आझाद मैदानावर ५ हजार बांधव जमतील, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात निर्धारित संख्येपेक्षा अधिक आंदोलक उपस्थित राहिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याच पार्श्वभूमीवर यावेळी परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते.
 
 
दरम्यान, मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याने पोलिसांसमोर सुरक्षेचेही मोठे आव्हान आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत भाविकांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर मुंबई कायम राष्ट्रविघातक शक्तींच्या निशाण्यावर राहिलेली असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जरांगे यांच्या प्रस्तावित आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असून, त्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही पोलिसांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.