नवी दिल्ली,
Jinping leaves for China ब्रिक्स शिखर परिषदेच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताचा दौरा आटोपून चीनला रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी त्यांनी भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन ऐकले आणि इतर ब्रिक्स नेत्यांसोबत सामूहिक छायाचित्रही काढले. शनिवारी दुपारी एअर चायनाच्या विमानाने जिनपिंग नवी दिल्लीत दाखल झाले होते. त्यांच्यासोबत उच्चस्तरीय शिष्टमंडळही आले होते. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ते होंगछी एन७०१ या कारमधून भारत मंडपम येथे पोहोचले होते, जिथे पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे स्वागत केले.
भारत दौऱ्यादरम्यान मोदी आणि जिनपिंग यांच्यात ४५ मिनिटांची द्विपक्षीय बैठक झाली. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चर्चेत दोन्ही नेत्यांनी भारत-चीन संबंधांकडे दीर्घकालीन आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. दोन्ही देशांमधील मतभेदांचे रूपांतर वादात होऊ नये, यावरही त्यांनी भर दिला. आर्थिक क्षेत्रातील प्रश्नांवर चर्चा करताना व्यापारातील संरचनात्मक असमतोल तसेच पुरवठा साखळीशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी परस्परांच्या चिंतांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले.
जिनपिंग यांचा भारत दौरा हा दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय चर्चांच्या मालिकेनंतर झाला. यापूर्वी बीजिंगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चा झाली होती. मात्र, अरुणाचल प्रदेशातील चीनच्या आक्रमक लष्करी हालचालींबाबत भारताच्या चिंता कायम आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यानही मोदी आणि जिनपिंग यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती. दरम्यान, २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि जिनपिंग यांच्यात झालेली ४५ मिनिटांची चर्चा या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.