४१व्या वर्षी माहिरा खान पुन्हा आई होणार!

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Mahira Khan to become a mother पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. वयाच्या ४१व्या वर्षी ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. सोशल मीडियावर एक साधा आणि सुंदर फोटो शेअर करत माहिराने आपल्या गर्भावस्थेची घोषणा केली. पांढऱ्या रंगाच्या सैल, पूर्ण बाह्यांच्या गाऊनमध्ये ती दिसत असून, एका हाताने तिने बेबी बंपवर हात ठेवत खास अंदाजात हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला.माहिराने कोणतेही मोठे फोटोशूट किंवा भव्य सोहळा न करता अगदी साध्या पद्धतीने ही घोषणा केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतानाच तिने चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. सध्या माहिरा टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये सहभागी झाली असून, महोत्सवाच्या ‘कम्युनिटी इम्पॅक्ट’ कार्यक्रमाचाही ती भाग राहिली आहे. सिनेसृष्टीतील योगदानासाठी तिचा सन्मानही करण्यात आला आहे. आपल्या फोटोसोबत माहिराने, “आम्ही योजना आखतो आणि त्यानंतर अल्लाहची योजना असते,” असा संदेश लिहिला.
 
 
 
mahira
माहिराच्या दुसऱ्या गर्भधारणेची बातमी व्यावसायिक सलीम करीम यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी समोर आली आहे. या दोघांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये खासगी विवाह सोहळ्यात लग्न केले होते. सलीम करीम आणि माहिरा खान यांचे हे पहिले अपत्य असेल. मात्र, माहिरासाठी हे दुसरे मातृत्व आहे. तिचा पहिला पती अली अस्करी यांच्यापासून तिला अजलान नावाचा १७ वर्षांचा मुलगा आहे. माहिरा खान ही पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘हमसफर’ या मालिकेमुळे तिला घराघरात प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ‘शहर-ए-जात’, ‘सदके तुम्हारे’, ‘बिन रोये’ आणि ‘सुपरस्टार’ यांसारख्या लोकप्रिय कलाकृतींमध्ये ती झळकली. २०१७ मध्ये ‘रईस’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान होता. याशिवाय ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा तिच्या चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक असून, हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नव्हता.