पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन
वर्धा,
chandrakant dada patil सेवाग्राम येथील बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या ६७ महिन्यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न आता शासन दरबारी पोहोचला. शनिवारी शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची रविभवन येथे बैठक घेऊन आपल्या समस्या मांडल्या. दरम्यान, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील आठवड्यात संस्था चालक, कर्मचारी आणि तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने शनिवार १२ रोजी रविभवन येथे ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचार्यांची बैठक पार पडली. यावेळी कर्मचार्यांनी ६७ महिन्यांचे थकित वेतन, नियमित वेतन आणि गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती मंत्र्यांसमोर मांडली.

कर्मचार्यांनी आपल्या वेतनाच्या मागणीसाठी १३ ऑगस्टपासून आंदोलन सुरू केले आहे. या पृष्ठभूमीवर पालकमंत्री डॉ. भोयर यांनी कर्मचार्यांची भूमिका जाणून घेत जिल्हाधिकार्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्यांची व्यवस्थापनासोबत बैठक झाली. या बैठकीत कर्मचार्यांना तातडीने एक महिन्याचे वेतन देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ६७ महिन्यांच्या थकबाकीपैकी केवळ एक महिन्याचे वेतन कर्मचार्यांना देण्यात आले असून, उर्वरित ६६ महिन्यांची थकबाकी अद्याप बाकी आहे. वेतनाचा प्रश्न नवीन नसून २०२३ मध्येही कर्मचार्यांनी १० महिने सविनय सत्याग्रह केला होता. त्यावेळी सहा महिन्यांचे वेतन देण्यासह नियमित ६० टक्के वेतन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही वेतनाचा प्रश्न पूर्णपणे सुटला नाही.
गेल्या साडेपाच वर्षांपासून वेतन थकीत असल्याने कर्मचार्यांना घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि कर्जाच्या हप्त्यांसह विविध आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उर्वरित ६६ महिन्यांची थकबाकी मिळण्यासोबतच नियमित वेतन सुरू होणे, ही कर्मचार्यांची प्रमुख मागणी आहे. पुढील आठवड्यात होणार्या बैठकीत संस्थाचालक, कर्मचारी आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्याने पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.