अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur Briberyदोन भूखंडाची अकृषक कर आकारणी करुन देण्यासाठी तहसीलदारासह दोघांनी दोन हजार रुपयांची लाच घेतली होती. या प्रकरणी लाचखोरीचा खटला चालविण्यात आला होता. या प्रकरणात लाच घेतल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे तहसीलदारासह दोघांची लाच घेण्याच्या आरोपातून न्यायालयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा निर्णय विशेष न्यायाधीश जहीर अब्बास शेख यांनी दिला. तत्कालिन तहसीलदार हरिराम रहांगडाले (वय ५०) आणि प्रफुल्ल उदाराम गाणार असे आरोपमुक्त झालेल्यांची नाव आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज रेवडे यांनी कळमना परिसरात दोन भूखंड विकत घेतले होते. ते दोन्ही भूखंडावर अकृषक कर आकारणी करायची होती. त्यामुळे युवराज यांनी ३ डिसेंबर २०१४ मध्ये नागपूर तहसील कार्यालयातील भास्कर जांभूळकर (सध्या मृत) यांची भेट घेतली. भास्कर यांनी कागदपत्रे घेऊन तहसीलदार हरिराम रहांगडाले यांना पैसे देऊन काम करुन देण्याचे आश्वासन दिले. काही पैसे घेतल्यानंतरही काम होत नसल्याचे बघून युवराजने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.
शहानिशा केल्यानंतर तत्कालिन पोलिस अधिकारी विनोद वाकडे यांनी सापळा रचला. त्यावेळी दोन हजार रुपयांची लाच तहसीलदार रहांगडाले यांच्यापर्यंत पोहचवायची होती. युवराजने जांभूळकरला पैसे देण्यासाठी बोलावले. मात्र, तो बाहेरगावी असल्याने तहसील कार्यालयातील दलाल प्रफुल्ल गाणार याच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले. गाणारने पैसे घेऊन तहसीलदारापर्यंत पोहचविण्याची तयारी दर्शविली. लाचेची रक्कम घेताच गाणार याला एसीबीने अटक केली. त्यानंतर या लाचखोरीच्या प्रकरणात तहसीलदार रहांगडाले यांना आरोपी बनविण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी केला. त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
या प्रकरणांमध्ये एकंदरीत पाच साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी युवराज याने आपल्या उलट तपासात कबूल केले की, वास्तविक पाहता तो तहसीलदार रहांगडाले यांना कधीही भेटला नाही. त्यामुळे त्यांनी लाच मागितली अथवा स्वीकारली हा प्रश्न उद्भवत नाही, असा युक्तिवाद आरोपीतर्फे ॲड.चंद्रशेखर जलतारे यांनी केला. भास्करने तहसीलदाराच्या नावावर पैसे मागितले होते, ही गोष्ट कदाचित सत्यही असू शकते. पण त्याच्यात तहसीलदाराचा काहीही सहभाग नव्हता. त्याचप्रमाणे प्रफुल्ल गाणार हा एक खाजगी व्यक्ती होता. तो सरकारी कर्मचारी नव्हता. त्यामुळे त्याच्या विरुद्ध लाच घेतल्याची केस उभी राहू शकत नाही, असा युक्तीवाद ॲड. शुक्ला यांनी केला. सरकारी वकील शेंदरे यांनी फिर्यादीवर विश्वास ठेवून सर्व आरोपींना शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. केस सुरु असतानाच भास्कर जांभूळकर यांचा मृत्यू झाला. सर्व परिस्थिती आणि पुरावा याचा विचार करून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींना संशयाचा लाभ देत निर्दोष मुक्त केले. सरकारतर्फे ॲड. लीलाधर शेंद्रे आणि आरोपीतर्फे ॲड. चंद्रशेखर जलतारे, ॲड मिलिंद चौरसिया ॲड. हर्षवर्धन नानोटी आणि ॲड.मुकेश शुक्ला यांनी बाजू मांडली.