हरे रामा हरे कृष्णाच्या तालावर थिरकले नागपूरकर!

तिरंगा चौकात रंगली नागपूर शहरातील पहिली अध्यात्मिक आणि सांस्कृतिक दहीहंडी

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-spiritual-dahi-handiडीजेचा दणदणाट नाही, फिल्मी गाण्यांचा जल्लोष नाही... त्याऐवजी ‘हरे रामा हरे कृष्णा’च्या भक्तिमय गजरात थिरकले नागपूरकर! तिरंगा चौकात विवेकानंद जनजागृती समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली नागपूर शहरातील पहिली अध्यात्मिक आणि सांस्कृतिक दहीहंडी उत्साह, भक्ती आणि संस्कृतीच्या अनोख्या संगमाने संपन्न झाली.
 
 
hariom
शनिवार, १२ सप्टेंबर रोजी झालेल्या या दहीहंडीचे हे १६ वे वर्ष होते. विशेष म्हणजे यंदाच्या आयोजनाची संपूर्ण संकल्पना १०० टक्के अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक स्वरूपाची ठेवण्यात आली होती. कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचा डीजे लावण्यात आला नाही. तसेच एकही फिल्मी अथवा पिक्चरचे गाणे न वाजवता संपूर्ण दहीहंडी इस्कॉनच्या भक्तिमय भजनांवर आणि हरिनाम संकीर्तनावर सादर करण्यात आली.
 
कार्यक्रमाची सुरुवात खाटू श्याम बाबांच्या आरतीने झाली. त्यानंतर ढोल-ताशा पथकाच्या दमदार सादरीकरणाने वातावरणात उत्साह निर्माण केला. यानंतर इस्कॉनचे विशालदास प्रभू आणि त्यांच्या चमूने ‘हरे रामा हरे कृष्णा’सह विविध भक्तिमय भजनांचे सादरीकरण केले. मंत्रा रॉक बँडच्या भक्तिमय संगीताने उपस्थित नागरिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
 
भजनांच्या तालावर युवक-युवतींसह महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक दहीहंडीला आधुनिक मनोरंजनाची जोड न देता भक्ती, संस्कृती आणि कुटुंबीयांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
 
दहीहंडीच्या ठिकाणी आकर्षक प्रतिकात्मक खाटू श्याम दरबार उभारण्यात आला होता. तसेच जगन्नाथ प्रभूंची विग्रहमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यामुळे तिरंगा चौकाला जणू भक्तिमय वातावरणाचे स्वरूप प्राप्त झाले होते. नागरिकांनी दर्शन घेतल्यानंतर भजन-कीर्तनाचा आनंद घेतला.
दहीहंडी स्पर्धेत पुरुष गटातील प्रथम पारितोषिक जय भोले क्रीडा मंडळ, नागपूर यांनी पटकावले. महिला गटातही जय भोले क्रीडा मंडळ, नागपूर यांनी प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली.
 
कार्यक्रमाला राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, माजी आमदार अनिल सोले, स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते बाल्या बोरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
 
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नगरसेवक गणेश चर्लेवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
दहीहंडीचा नवा ‘नागपुरी पॅटर्न’
नागपूरच्या दहीहंडी संस्कृतीत एक वेगळा अध्याय लिहिणाऱ्या या आयोजनाची विशेष चर्चा झाली. ‘डीजे नको, फिल्मी गाणी नको; भक्ती, संस्कृती आणि कुटुंबाचा उत्सव हवा’ हा संदेश देत विवेकानंद जनजागृती समितीने अध्यात्मिक दहीहंडीचा नवा पॅटर्न नागरिकांसमोर ठेवला.
भक्तीच्या सुरात दहीहंडी, संस्कृतीच्या रंगात उत्सव आणि कुटुंबाच्या सहभागाने जल्लोष अशी या सोहळ्याची ओळख ठरली.