ब्रिक्समध्ये भारताची मुत्सद्देगिरी यशस्वी!

नवी दिल्ली घोषणेचे अमेरिकेत कौतुक

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
New Delhi Declaration praised in the US. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत पहिल्याच दिवशी संयुक्त ‘नवी दिल्ली घोषणा’ जारी करण्यात भारताला यश आले आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात हे महत्त्वाचे राजनैतिक यश मानले जात असून, अमेरिकन दक्षिण आशिया विश्लेषक मायकल कुगेलमन यांनीही भारताच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यांच्या मते, यापूर्वी निर्माण झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर सर्व सदस्य देशांच्या सर्वोच्च नेत्यांच्या उपस्थितीत एकमताने घोषणा जारी होणे ही भारतासाठी मोठी उपलब्धी आहे.
 
 
 
a24335456657
 
कुगेलमन यांनी सांगितले की, याच वर्षाच्या सुरुवातीला ब्रिक्सच्या परराष्ट्र मंत्री स्तरावरील बैठकीत संयुक्त निवेदन जारी करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे शिखर परिषदेतही संयुक्त घोषणा होईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, भारताने अध्यक्षपदाच्या काळात विविध आव्हानांवर मात करत अखेर संयुक्त घोषणा जारी करण्यात यश मिळवले. भारतासमोर इराणमधील युद्धाचा मुद्दा तसेच अमेरिका आणि तिच्या धोरणांशी संबंधित प्रश्न ही प्रमुख आव्हाने असल्याचेही कुगेलमन यांनी नमूद केले.
 
 
घोषणेच्या सुरुवातीच्या भागात ब्रिक्सच्या मूलभूत तत्त्वांचा पुनरुच्चार करण्यात आल्याने त्यात फारसे आश्चर्य नसल्याचे कुगेलमन म्हणाले. मात्र, जागतिक व्यापार व्यवस्थेतील व्यत्यय, अमेरिकेची आयात शुल्क धोरणे आणि निर्बंध यांचा घोषणेत करण्यात आलेला उल्लेख अमेरिकन प्रशासनाला नाराज करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यांमुळे ब्रिक्स आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक मतभेद पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी झालेल्या बैठकीत ब्रिक्स नेत्यांनी शाश्वत विकासासाठी २०३० अजेंडा आणि त्यातील दीर्घकालीन, लोककेंद्रित उद्दिष्टांची संतुलित अंमलबजावणी करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. अत्यंत गरिबीसह गरिबीच्या सर्व प्रकारांचे निर्मूलन करणे हे जगासमोरील सर्वात मोठे आव्हान असून, शाश्वत विकासासाठी ते अत्यावश्यक असल्याचे घोषणेत नमूद करण्यात आले आहे. २०३० अजेंडा नाविन्यपूर्ण, समन्वित, पर्यावरणपूरक, खुल्या आणि सामायिक पद्धतीने पुढे नेण्याच्या महत्त्वावरही ब्रिक्स नेत्यांनी भर दिला आहे.