अमरावती जिल्ह्यात २ हजार १०९ स्थानी सार्वजनिक गणेशोत्सव

३९१ गावात ‘एक गाव एक गणपती"

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
 
 
अमरावती,
public ganeshotsav अमरावती शहरासह जिल्ह्यात सोमवार, १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात २ हजार १०९ सार्वजनिक मंडळ गणेशमूर्तींची स्थापना करणार आहे. अमरावती शहरात अंदाजे ५९० ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना होणार असून, एक खिडकी योजनेतून आतापर्यंत ५६७ गणेश मंडळांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित मंडळांनी तातडीने परवानगी घ्यावी आणि विनापरवानगी गणेशमूर्तीची स्थापना करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 
 
public ganeshotsav
 
पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यात तीन पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त, ३० पोलिस निरीक्षक, ६७ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक तसेच सुमारे १ हजार ८०० पोलिस अंमलदारांचा समावेश आहे. याशिवाय आरसीपी, क्यूआरटी, एसआरपीएफची एक कंपनी तसेच ४०० पुरुष आणि १०० महिला होमगार्ड तैनात राहणार आहेत.
 
 
ग्रामीण भागात १ हजार ५०९ ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. त्यापैकी ३९१ गावात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, २० पोलिस निरीक्षक, ११७ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक आणि १ हजार ७०० पोलिस अंमलदार बंदोबस्तात राहणार आहेत. तीन दंगा नियंत्रण पथके, एक जलद प्रतिसाद पथक, एसआरपीएफची एक कंपनी व एक प्लाटून तसेच ६५० पुरुष आणि १५० महिला होमगार्डही तैनात करण्यात आले आहेत.
 
 
शहरातील गर्दीची ठिकाणे, महत्त्वाचे चौक तसेच संवेदनशील भागांत फिक्स पॉईंट, सर्व्हेलन्स व्हॅन, १४ सीआर मोबाईल, १० दामिनी पथके, बीट मार्शल आणि डायल ११२ची वाहने गस्त घालणार आहेत. मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही व व्हिडिओग्राफीद्वारे निगराणी केली जाणार आहे.
 
पोलिस सूचनांचे पालन करा
सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रक्षोभक पोस्ट, आक्षेपार्ह गाणी किंवा संदेशांवर सायबर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. मिरवणुकीत ज्वलनशील पदार्थ, शस्त्रे, काठ्या तसेच आक्षेपार्ह गाणी व देखावे यांना बंदी राहणार आहे. सराईत गुन्हेगार व समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी डॉल्बी व डीजे चालकांनी कायदेशीर ध्वनीमर्यादेचे पालन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
 
 
गणेशोत्सव शांततेत, भयमुक्त वातावरणात आणि जातीय सलोखा व सामाजिक एकोपा कायम ठेवून साजरा करावा. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त राकेश ओला आणि जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी केले आहे.