जावा समुद्रात २४० प्रवाशांचे जहाज बेपत्ता

शेवटचे ठिकाण १४८ किमी अंतरावर

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
जकार्ता,
Ship missing in the Java Sea इंडोनेशियात २४० प्रवासी आणि कर्मचारी असलेले एक जहाज जावा समुद्रात बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. पूर्व जावाहून बोर्नियो बेटावरील दक्षिण कालीमंतनकडे जाणाऱ्या या जहाजाचा अचानक संपर्क तुटला. जहाजाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इंडोनेशियाच्या बचाव यंत्रणांनी रविवारी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
 
 
 
32556
दक्षिण कालीमंतन प्रांताची राजधानी बंजरमासिन येथील शोध आणि बचाव कार्यालयाला जहाजाची संपर्क यंत्रणा बंद पडल्याची माहिती मिळाली. सुरबाया येथून बंजरमासिनकडे निघालेले हे जहाज जावा समुद्रात बेपत्ता झाले. शोध आणि बचाव कार्यालयाचे प्रमुख आय. पुटू सुडायाना यांनी सांगितले की, जहाजाच्या ऑपरेटरने खराब हवामानाचा सामना करावा लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिल्यानंतर ही बाब समोर आली. प्राथमिक माहितीनुसार, जहाजाचे शेवटचे ज्ञात ठिकाण बंजरमासिनमधील एका धक्क्यापासून सुमारे १४८ किलोमीटर अंतरावर होते.
 
 
जहाजाची ऑपरेटर कंपनी पीटी व्हर्गो योएल रिहीने दिलेल्या माहितीनुसार, व्हर्गो ट्रान्सपोर्ट ८ हे जहाज शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:१३ वाजता सुरबाया येथून रवाना झाले होते. त्यानंतर जहाजाशी संपर्क तुटला. बंजरमासिनमधील बसिरीह शोध आणि बचाव धक्क्यावरून बचाव पथक रवाना करण्यात आले असून, जहाजाचे शेवटचे संभाव्य ठिकाण लक्षात घेऊन एका बचाव जहाजालाही पाठवण्यात आले आहे. जहाजावर मोठ्या संख्येने प्रवासी आणि कर्मचारी असल्याने सर्व उपलब्ध मनुष्यबळ व संसाधने शोधकार्यात उतरवण्यात आली आहेत. सुडायाना यांच्या नेतृत्वाखालील पथक सागरी अधिकारी आणि अन्य संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत असून, परिसरातील हवामानाच्या परिस्थितीवरही सतत लक्ष ठेवले जात आहे.