२७ दिवसांनी बाहेर काढला विद्यार्थ्याचा मृतदेह

भर पावसात जागेवरच शवविच्छेदन

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
राजेश बेठेकरच्या मृत्यूचे गूढ उकलणार?
 
 
अमरावती,
students body recovered after 27 days शहरातील वादग्रस्त महर्षी पब्लिक स्कूल आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर याच्या मृत्यूला तब्बल २७ दिवस उलटल्यानंतर शनिवारी सायंकाळी भर पावसात त्याचा कारंजखेडा येथे पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. चिखलदरा पोलिसांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. या कारवाईमुळे राजेशच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
students body
 
१६ ऑगस्ट रोजी राजेश बाबू बेठेकर या विद्यार्थ्याचा मृत्यू शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला होता. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नातून विषबाधा झाल्याचाही आरोप होता. या गंभीर प्रकरणानंतर शाळा प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. घटनेनंतर तब्बल २७ दिवसांनी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याची कारवाई केली. शनिवारी सायंकाळी कारंजखेडा येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसाची पर्वा न करता ही कारवाई करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. यावेळी चिखलदरा तहसीलदार, चिखलदरा ठाणेदार तसेच चिखलदरा तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच मृत विद्यार्थ्याचे नातेवाईक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गावातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
 
 
याच प्रकरणात अमरावतीचे अपर आदिवासी विकास विभागाचे आयुक्त संदीप गोलाईत यांनी महर्षी पब्लिक स्कूल आदिवासी आश्रमशाळेची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या भोजनासह पिण्याचे पाणी, निवास, गणवेश आणि आरोग्य सुविधांबाबत अनेक त्रुटी आढळल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने शाळेतील खानावळीला टाळे ठोकले होते. राजेश बेठेकर यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित घटनेची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले होते. आता २७ दिवसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आल्याने या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. शवविच्छेदन अहवालात काय निष्पन्न होते आणि राजेशच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय होते, हे अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
 
 
तातडीने कारवाईची मागणी
दरम्यान, या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून महर्षी पब्लिक स्कूलच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल करावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राजेश बेठेकरच्या कुटुंबीयांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर प्रकरणात प्रशासनाने दिरंगाई न करता तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.