मैदानात उतरताच वैभवच्या नावावर होणार ऐतिहासिक विक्रम!

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
vaibhav will set a historic record भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला १३ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे असणार आहे. पहिल्या सामन्यात त्याला अंतिम संघात स्थान मिळाल्यास भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील मोठा विक्रम त्याच्या नावावर होऊ शकतो. मैदानात उतरताच वैभव भारतात आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरणार आहे.
 
 
सध्या हा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने १९९० मध्ये वयाच्या १७ वर्षे आणि २५३ दिवसांनी पुण्यात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळत भारतात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. वैभवने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सहभाग घेतल्यास तो केवळ १५ वर्षे आणि १७० दिवसांचा असेल. त्यामुळे सचिनचा हा विक्रम मोडून वैभवच्या नावावर नवा विक्रम नोंदवला जाईल. यासोबतच भारताच्या भूमीवर पूर्ण सदस्य संघाकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू होण्याचा मानही त्याला मिळेल. या विक्रमावर सध्या अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान याचे नाव आहे. त्याने २०१८ मध्ये वयाच्या १७ वर्षे आणि ७८ दिवसांनी भारतात सामना खेळला होता.
 
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर वैभव सूर्यवंशीने आपल्या कामगिरीने सातत्याने लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंत त्याने सहा डावांमध्ये दोन अर्धशतकांच्या मदतीने ३२.१६च्या सरासरीने १९३ धावा केल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. वैभवच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक कधी नोंदवले जाते, याकडेही क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.