पिपरीच्या पुलावरून पाणी; नदी-नाले तुडुंब

गावकर्यांची वर्दळ ठप्प; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
समुद्रपूर,
pipri bridge यंदा पावसाने सर्वांनाच मेटाकुटीला आणले. जुलै महिन्यात तीन दिवस दमदार पाऊस बरसला. त्यानंतर थेट सप्टेंबर १२ रोजी पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यंतरी पावसाने दांडी मारल्याने पाण्याअभावी पिके करपू लागली. दरम्यान, शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने लहान मोठे नाले तुडूंब भरून वाहू लागले. समुद्रपूर तालुक्यातील पिपरी व रासा गावाकडे जाणार्या मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पहाटे ५ वाजेपासून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्यामुळे गावकर्यांचे अवागमन प्रभावित झाले होते. पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी धोका पत्करून पुलावरून जाणे टाळावे, असा सतर्कतेचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
 
 
pipri bridge
 
अनेक दिवसांपासून पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर पिकांना चांगलाच फटका बसला होता. अनेक ठिकाणी पीक कोमेजायला लागले असतानाच तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच होता. दमदार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, अनेक सखल भागात पाणी साचले आहे. या पावासामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला असून आनंदाचे वातावरण आहे.
 
हवामान विभागाने पुढील काळात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी नदी, नाले तसेच पुलाजवळ अनावश्यक गर्दी करू नये आणि पाण्याच्या प्रवाहातून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन तहसीलदार कपिल हाटकर यांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थिती अथवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी तातडीने तहसील कार्यालय किंवा संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही तहसीलदार हाटकर यांनी सांगितले. पिपरी पुलाच्या नालावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार विकास गायकवाड यांनी याठिकाणी पोलिसांना तैनात केले आहे.