अहेरी,
patanil ganpati किर्र जंगलाचा प्रदेश अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीच्या घनदाट सागवानाच्या आणि बांबूच्या रांजीत वसलेला ’पातानील गणेश’ भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अहेरी तालुक्यातील आल्लापल्ली-सिरोंचा रोडवर आल्लापल्ली येथून अवघ्या 7 किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गणरायाची ख्याती ’नवसाला पावणारा गणपती’ अशी सर्वदूर पसरली आहे. मात्र, या मंदिराच्या स्थापनेची कहाणी अत्यंत अनोखी आणि निसर्गाच्या चमत्काराशी जोडलेली आहे.
1980 च्या दशकात अहेरी भागातील जगप्रसिद्ध सागवान लाकडांची तोडणी व वाहतुकीसाठी हत्तींचा वापर केला जात असे. 1981 मध्ये वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या चार हत्तींपैकी एक हत्ती अचानक किर्र जंगलात बेपत्ता झाला. सलग दोन दिवस शोध घेऊनही हत्तीचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर हताश झालेल्या वनकर्मचार्यांनी व मजुरांनी श्री गणेशाला साकडे घातले. ‘हत्ती सापडू दे, 11 पोती नारळ फोडू’ असे साकडे घालताच काही क्षणांत जंगलात हरवलेल्या हत्तीची किंकाळी ऐकू आली. मजूर आवाजाच्या दिशेने धावले असता हत्तीच्या गळ्यातील साखळदंड एका दगडात अडकल्याचे दिसले. तो दगड बाहेर काढला असता, त्यावर चक्क श्री गणेशाचे सुंदर रूप कोरलेले आढळले! वनविभागावरील संकट दूर झाल्याच्या आनंदात कर्मचार्यांनी व मजुरांनी ती मूर्ती स्वच्छ करून तिची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून आजपर्यंत या गणपतीचा पूजा करण्यात येते.
सोयी-सुविधांचे विघ्न दूर करण्याची भक्तांची मागणी
आज हा पातानील गणपती परिसरातील मजुरांचा आणि भक्तांचा मुख्य श्रद्धास्तंभ बनला आहे. मजुरांनी लावलेल्या झाडाभोवती आता चबुतरा बांधण्यात आला असून, पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे. मात्र हे मंदिर वन विभागाच्या हद्दीत असल्याने इतर शासकीय विभागांकडून निधी मिळण्यात अडचणी येत आहेत. पावसाळ्यात जंगली श्वापदांच्या भीतीमुळे येथे पोहोचणे कठीण असते.patanil ganpati तर केवळ हिवाळा आणि उन्हाळ्यातच भाविक येथे जाऊ शकतात. आजही मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे या अथांग जंगलातील भक्तांचे आणि रस्त्याचे विघ्न आता या विघ्नहर्त्यानेच दूर करावे, अशी आर्त हाक भाविकांकडून मारली जात आहे.