पणजी
aap गोव्याच्या राजकारणात एक मोठी राजकीय घडामोड घडत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) आणि गोवा फॉरवर्ड पार्टी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. ‘आम आदमी पार्टी’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एका विशेष घोषणेदरम्यान या नव्या राजकीय युतीची माहिती दिली. या दोन्ही पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या या युतीला ‘गोवा फर्स्ट’ असे नाव देण्यात आले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात या आघाडीची जोरदार चर्चा सुरू झाली असून, गोव्यातील मतदारांना भाजप आणि काँग्रेसच्या पारंपरिक राजकारणाला एक भक्कम आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी पारंपरिक राजकीय पक्षांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. निवडणुकांच्या काळात भाजप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढल्याचे नाटक करतात, परंतु पडद्यामागे सरकार स्थापनेसाठी बंद खोलीत हातमिळवणी करतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. गोवा फॉरवर्ड पार्टी आणि आम आदमी पार्टीने स्थापन केलेली ‘गोवा फर्स्ट’ आघाडी गोव्यातील जनतेला एक खरा आणि प्रामाणिक राजकीय पर्याय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्यातील नागरिक कित्येक वर्षांपासून येथील राजकीय स्थिती पाहत असून, त्यांच्यासमोर कोणताही सक्षम पर्याय उपलब्ध नव्हता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मतदारांना नाइिलाजास्तव काँग्रेस किंवा भाजपलाच मत द्यावे लागले आहे, कारण या दोन्ही पक्षांमध्ये एकप्रकारची छुपी युती असल्याचे दिसून आले आहे. जे मतदार भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना सत्तेपासून दूर ठेवू इच्छितात, त्यांच्यासाठी ही ‘गोवा फर्स्ट’ आघाडी एक उत्तम संधी ठरले, असे प्रतिपादन केजरीवाल यांनी केले. आगामी निवडणुकीत आमची आघाडी पूर्ण आत्मविश्वासाने आणि स्वतःच्या बळावर विजय मिळवून स्वबळावर सरकार स्थापन करेल, असा ठाम दावा त्यांनी केला. ही एक अत्यंत विश्वासार्ह आणि प्रामाणिक युती असून, ती केवळ गोव्याच्या जनतेप्रती वफादार राहून काम करेल, असेही ते म्हणाले.
गोव्यातील जनतेला आतापर्यंत दोन वेळा राजकीय फसवणुकीचा सामना करावा लागला असून, जनता तिसऱ्यांदा असा धोका पत्कारणार नाही, असा इशारा केजरीवाल यांनी दिला. गोवा सरकारवर निशाणा साधत त्यांनी असे निदर्शनास आणले की, सध्याच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर माजी काँग्रेस नेत्यांचा सहभाग आहे. यावरून हे सरकार खऱ्या अर्थाने भाजप किंवा काँग्रेसचे नसून, ते पैशांचे आणि माफियांचे सरकार बनले आहे, जिथे ‘गोवा फर्स्ट’ ऐवजी ‘पॉकेट फर्स्ट’ला प्राधान्य दिले जात असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
या राजकीय समीकरणांमध्ये aap ‘गोवा फॉरवर्ड पार्टी’ हा एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष असून, त्याचे नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे आहे. सध्या चाळीस सदस्यांच्या गोवा विधानसभाृमध्ये विजय सरदेसाई हे त्यांच्या पक्षाचे एकमेव आमदार आहेत. दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे गोव्यामध्ये सध्या दोन आमदार कार्यरत आहेत, ज्यामध्ये बेनौलिम मतदारसंघाचे वेंझी विएगास आणि वेलिम मतदारसंघाचे क्रूझ सिल्वा यांचा समावेश असून हे दोन्ही आमदार दक्षिण गोव्याचे प्रतिनिधित्व करतात. उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सर्व उमेदवारांकडून एक शपथपत्र (एफिडेविट) लिहून घेतले होते, ज्यामध्ये विजयानंतर कोणताही उमेदवार फुटणार नाही किंवा अन्य पक्षात जाणार नाही, अशी हमी घेण्यात आली होती. या धोरणाला जागत आम आदमी पक्षाचे दोन्ही विजयी आमदार आजतागायत पक्षाशी प्रामाणिक राहून सोबत कार्यरत आहेत.