वर्धा
tiger attack selu वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबीयांशी पाच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, कुटुंबीय १ कोटीच्या नुकसान भरपाईवर ठाम आहेत. प्रशासन पीडितांच्या सोबत आहे. पाच दिवसांपासून मृतदेह शवागारात असून हेळसांड होत आहे. या प्रकरणावर सायंकाळीपर्यंत सकारात्मक निर्णय होईल, अन्यथा मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आज सोमवार १४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत दिले.
सेलू तालुक्यातील रायपूर येथे ९ रोजी वाघाने भगवान धुर्वे यांना ठार केले. १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी अन्त्यसंस्कार होऊ शकले नाहीत. अन्त्यसंस्कारासाठी पीडितांच्या कुटुंबीय आणि ग्रामस्थांशी दिवसरात्र चर्चा सुरू आहे. यासोबतच झुडपांनी वेढलेला रस्ताही मोकळा करण्याचे काम सुरू आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी ३५ मजूर आणि वनकर्मचारी दिवसरात्र तैनात आहेत. कुटुंबातील एकाला हंगामी मजूर म्हणून काम देण्यात येणार असून नोकरीसंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी पुन्हा काही करता येईल काय, यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. प्रशासन गावकऱ्यांच्या पाठीशी आहे. मृतदेह शवागारात कुजत असल्याने अन्त्यसंस्कार करणे आवश्यक आहे. सायंकाळपर्यंत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, तसे न झाल्यास मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कारवाई करण्याचे संकेतही जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी यावेळी दिले.
पत्रकार परिषदेला पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, बोर अभयारण्याचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजसिंह पवार, सहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रय लोंढे, तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे उपस्थित होते.
कुटुंबातील एकाला जिप्सीचा पर्याय
भगवान धुर्वे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील एकाला एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या वतीने उदरनिर्वाहासाठी जिप्सीचा पर्याय होऊ शकतो का, यावर विचार सुरू आहे. तसा प्रस्तावही पाठविण्याचे विचाराधीन असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
चर्चा सकारात्मक
धुर्वे यांच्यावर अन्त्यसंस्काराला गावकर्यांनी विरोध केला आहे. परंतु, प्रशासन सातत्याने संपर्कात आहे. सायंकाळनंतर गावकरी आणि नातेवाईक मृतकाच्या अन्त्यसंस्कारासाठी सकारात्मक असल्याची माहिती जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी तरुण भारत सोबत बोलताना दिली.