अकोला
akola rain update तब्बल दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हाभरात पावसाचे पुनरागमन झाले असून तूर्तास पिकांना संजीवनी मिळाली असली तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्हाभरात चोवीस तासात ५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जलप्रकल्प मात्र तहानलेले असल्याने भविष्यातील पाणी टंचाई मोठी समस्या बनली आहे.
यंदा हवामान विभागाने एलनीनोचा प्रभाव असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.त्याचा प्रभाव तीव्र झाल्याने गेल्या दीड महिन्यांपासून पावसाचा खंड होता. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या नजरा या आकाशाकडे लागून होत्या, अखेर शनिवार व रविवारी पावसाचे आगमन झाल्याने काहीअंशी बळीराजा सुखावला आहे.जिल्ह्यात खरिपात ४ लाख २६ हजार ६६९ हेक्टरवर पिकांची लागवड झालेली असून पावसाचा खंड पडल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांची स्थिती अत्यंत बिकट असून पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.यावर्षी वेळेवर पाऊस न आल्याने कपाशी पिकाची वाढ खुंटली तर सोयाबीन पिवळे पडून काही ठिकाणी सुकून गेले आहेत.दरम्यान जिल्ह्याभरात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली असली तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक तर अकोल्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुका पाऊस मिमी
आकोट १२.८
तेल्हारा १४.३
बाळापूर ३.५
पातूर ४.९
अकोला १.६
बार्शीटाकळी २.२
मूर्तिजापूर २.५
सोयाबीन पिकांची बिकट स्थिती
खरिपात सर्वाधिक पीक घेतल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाची यंदा दयनीय अवस्था आहे. जिल्ह्यात २ लाख ३६ हजार ४५९ हेक्टरवर पिकांची सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मात्र यंदा वेळेवर पाऊस न आल्याने ऐन फुलोर वर आलेले पीक अनेक ठिकाणी सुकून गेले आहे. कृषी विभागांना देखील शासनाला सादर केलेल्या अहवाला उत्पादन ५० टक्के घटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.याशिवाय काही ठिकाणी येलो मोझाक चा परिणाम देखील दिसून येत आहे.