मानोरा,
banjara-reservationबंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करून संविधानिक आरक्षण देण्याच्या मागणीसाठी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आठ बंजारा बांधवांनी १३ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासक समितीच्या कामाचा प्रगती अहवाल जाहीर करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीवर अभ्यास करण्यासाठी शासनाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी समिती स्थापन केली. मात्र, समितीने आतापर्यंत केलेला अभ्यास, घेतलेल्या बैठका आणि अहवालाची सद्यस्थिती याबाबत समाजाला स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, अशी उपोषणकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळे समितीने केलेल्या कामाचा सविस्तर प्रगती अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. एसटी आरक्षणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत बंजारा समाजाला एसटीच्या धर्तीवर शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सवलती द्याव्यात, तसेच समितीचा अहवाल तातडीने पूर्ण करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.
तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्याचीही मागणी आहे.पोहरादेवी येथे उपोषणाला बसलेल्यांमध्ये सतीश पवार (बीड), श्रीकांत राठोड (जालना), अंकुश राठोड (मेहकर), जीनकर राठोड (पुसद), सुरेश राठोड (हिंगोली), रमेश उर्फ सोनू पवार (उमरी खुर्द), नामदेव राठोड (औंढा) आणि जयसिंग रामावत (आर्णी) यांचा समावेश आहे. पोहरादेवी हे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असल्याने येथे सुरू झालेल्या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आहे. समितीचा अहवाल कधी जाहीर होणार आणि एसटी आरक्षणाच्या मागणीवर शासनाची पुढील भूमिका काय असणार, याकडे आता समाजाचे लक्ष लागले आहे.