नागपूर,
पराग मगर
ganesh utsav कलेची देवता आणि सर्वांचा लाडका श्रीगणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा आता संपली असून सोमवारी (१४ सप्टेंबर) घरोघरी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेश स्थापनेच्या पूर्वसंध्येला महालातील चितारओळीपासून बडकस चौकापर्यंत गणेशभक्तांची मोठी लगबग पाहायला मिळाली. सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमनही शनिवारपासूनच सुरू झाले असून ढोल-ताशांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने महाल परिसर गणेशमय झाला.
नागपुरातील बहुतांश सार्वजनिक गणेशमूर्तींची निर्मिती महालातील चितारओळीत होते. गेल्या तीन-चार महिन्यांपासून मूर्तिकारांकडून सुरू असलेल्या गणेशमूर्ती निर्मितीच्या कामाला गेल्या आठवडाभरात वेग आला होता. गणेशमूर्ती घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली असतानाच, चितारओळीतील गर्दी टाळण्यासाठी अनेक सार्वजनिक मंडळांनी शनिवारी आणि रविवारीच आपल्या लाडक्या गणरायाला प्रतिष्ठापना स्थळी नेले.
संतीचा गणपती आणि इतवारीचा राजा यांचे शनिवारी ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले. रविवारी राजाबाक्षाचा राजा, चंद्रनगरचा चिंतामणी, मानकापूरचा राजा यांच्यासह अन्य मानाच्या गणपतींच्या मिरवणुका निघाल्या. यामुळे बडकस चौक परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने वातावरण अधिक आल्हाददायक झाले.
वस्त्रालंकारातील लोभस गणरायाला पसंती
गणेशमूर्ती विक्रीचे प्रमुख केंद्र असलेल्या चितारओळीत शनिवारपासूनच भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यंदा वस्त्रालंकारांनी सज्ज असलेल्या, आकर्षक फेटे-पगडी परिधान केलेल्या आणि पारंपरिक तसेच राजेशाही रूपातील गणेशमूर्तींना विशेष पसंती मिळत आहे. सजावटीमुळे मूर्तींच्या किमतीत यंदा सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गणेश स्थापनेसाठी सकाळी ११.११ ते दुपारी १.३७ शुभ
यंदा सोमवार, १४ सप्टेंबर रोजी हरितालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने गणेश स्थापनेच्या मुहूर्ताबाबत भाविकांमध्ये सांभ्रमिक उत्सुकता आहे. गणेशमूर्तीच्या स्थापनेसाठी मध्यान्ही असलेली चतुर्थी तिथी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे सकाळी घाईघाईने स्थापना करण्याची आवश्यकता नसून सकाळी ११.११ ते दुपारी १.३७ हा गणेश स्थापनेसाठी विशेष शुभ मुहूर्त असल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी सांगितले.
हरितालिका आणि गणेश स्थापनेची दुहेरी लगबग
हरितालिका आणि गणेश स्थापना एकाच दिवशी आल्याने महिलांची तयारीची लगबग वाढली आहे. हरितालिकेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, फुले, फळे आणि पूजेच्या वस्तूंसोबतच गणरायाच्या स्थापनेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. हरितालिका पूजेची तयारी, गणेश स्थापना, घराची सजावट, नैवेद्य आणि पूजेची व्यवस्था अशा दुहेरी तयारीत महिला व्यस्त असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
तीन हजार पोलिस रस्त्यावर
शहरात आज लाडक्या बाप्पांचे आगमन होणार असून बाप्पांच्या आगमनात कोणतेही विघ्न किंवा अडथळा येऊ नये म्हणून शहर पोलिस सज्ज झाले आहेत. बाप्पांच्या आगमन मिरवणूक आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तब्बल तीन हजार पोलिस रस्त्यावर बंदोबस्तासाठी सज्ज राहणार आहेत.ganesh utsav पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यावर्षी गणेश बंदोबस्ताची कमान स्वतः सांभाळली आहे. यावेळी विविध पथके, ड्रोन कॅमेरे, साध्या वेशात पोलिस कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहे. यासोबत वाहतूक पोलिस चोवीस तास रस्त्यावर नियोजन करताना दिसणार आहेत.