प्लायवुडच्या गोदामाला भीषण आग; २५ हून अधिक अग्निशमन गाड्या घटनास्थळी

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली
plywood warehouse fire दिल्लीतील दल्लूपुरा परिसरात रविवारी एका प्लायवुडच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सुमारे ३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या या विशाल गोदामात मोठ्या प्रमाणावर प्लायवुडचा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीमुळे आकाशात उठलेले काळ्या धुराचे दाट लोट दूरवरूनही स्पष्ट दिसत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
 

delhi plywood warehouse fire: 25+ fire tenders deployed in dallupura 
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २५ हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन विभागातील वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकांनी गोदामाच्या आसपास असलेली घरे रिकामी करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.
या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आग विझविण्याच्या मोहिमेदरम्यान एका स्टेशन ऑफिसरची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्य अग्निशमन अधिकारी एम. के. चट्टोपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची सुरुवातीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या स्टेशन ऑफिसरने आग विझविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र, या वेळी अत्यंत दाट आणि काळ्या धुराच्या संपर्कात आल्याने तसेच धूर श्वासावाटे आत गेल्याने त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची सध्याची प्रकृती नेमकी कशी आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
चट्टोपाध्याय यांनी सांगितले plywood warehouse fire की, रविवारी दुपारी सुमारे ३.३० वाजता गोदामाला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. सुरुवातीला चार ते पाच अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या. मात्र, आग किती मोठ्या प्रमाणावर पसरली आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर परिस्थिती ‘मध्यम श्रेणीतील’ आगीची असल्याचे वर्गीकरण करण्यात आले आणि त्यानंतर घटनास्थळी पाठविण्यात आलेल्या अग्निशमन गाड्यांची संख्या वाढवून २५ हून अधिक करण्यात आली.
गोदामाच्या चारही बाजूंनी अग्निशमन दलाला प्रवेशाचा मार्ग उपलब्ध नसल्याने आग विझविण्याच्या कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या समोरील बाजूनेच वॉटर कॅनन आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच गोदामाच्या मध्यभागातील शेड कोसळल्याने बचाव आणि अग्निशमन मोहिमेसमोरील आव्हाने आणखी वाढली आहेत.
अडचणींची परिस्थिती असतानाही अग्निशमन दलाचे जवान पूर्ण ताकदीनिशी आणि निष्ठेने आग विझविण्याच्या कामात तैनात आहेत. लवकरच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात येईल, असा विश्वास अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे.