मुंबई
disha salian राजधानी मुंबईतील बहुचर्चित दिशा सालियन मृत्यूप्रकरणाला अखेर नवे वळण मिळाले असून, तब्बल सहा वर्षांनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) आपला जबाब नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या जबाबाच्या आधारे सीबीआयने दिशाच्या मृत्यूप्रकरणी अखेर एफआयआर दाखल केला आहे. मात्र, या एफआयआरमध्ये नेमके कोणाला आरोपी करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर म्हणून दिशा सालियन काम करत होती. त्यापूर्वीही तिने काही अभिनेत्यांसाठी मॅनेजर म्हणून काम केले होते. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या अवघ्या सहा दिवस आधी दिशाचा मृत्यू झाला होता. ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. त्यावेळी दिशाने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, दिशाने आत्महत्या केली नसून तिच्या मृत्यूमागे कटकारस्थान असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला होता. तसेच तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता.
दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाला. या दोन्ही मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर दिशा सालियनच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी सातत्याने होत होती. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची तसेच प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिशाच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी आणि एफआयआर दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, सहा वर्षांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत हत्या, कलम ३७६ अंतर्गत सामूहिक अत्याचार, कलम १२०(ब) अंतर्गत कट रचणे, कलम २०१ अंतर्गत पुरावे नष्ट करणे, तसेच कलम २१७ आणि २१८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता हत्या आणि सामूहिक अत्याचाराच्या आरोपांची गंभीर जोड मिळाली आहे.
दरम्यान, दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी तिचे शवविच्छेदन करण्यात आले होते. उपलब्ध पोस्टमॉर्टम अहवालात तिच्या शरीरावर हात, पाय आणि छातीवर जखमा झाल्याचा उल्लेख आहे. दिशाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्राव होत असल्याचेही पोस्टमॉर्टम अहवालात नमूद आहे. मात्र, दिशावर कोणताही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नसल्याचे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
आता सतीश सालियन यांच्या जबाबाच्या आधारे दाखल झालेल्या एफआयआरमुळे या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. या गुन्ह्यात नेमके कोण आरोपी आहेत, हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नसले तरी हत्या, सामूहिक अत्याचार, कटकारस्थान आणि पुरावे नष्ट केल्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाल्याने पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.