कारंजा लाड,
farmers-hunger-strikeतालुक्यातील कामरगाव मंडळात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीनसह अन्य पिके हातची गेल्याने शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, कारंजा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, यासह विविध मागण्यांसाठी कामरगाव येथील आठवडी बाजारात १२ सप्टेंबरपासून शेतकरी नेते भारत भगत यांच्या मार्गदर्शनात शेतकर्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला असून, या आंदोलनाला शेतकरी व नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
कामरगाव मंडळात तालुयातील इतर भागांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सुरुवातीला पेरणी झाल्यानंतर पिकांना पोषक पाऊस न मिळाल्याने सोयाबीन, मूग, उडदासह विविध खरीप पिकांना मोठा फटका बसला. अनेक शेतांमध्ये उभी पिके करपली असून, काही ठिकाणी उत्पादनाची आशाही मावळली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हातात उत्पन्नाचे कोणतेही साधन उरलेले नाही. दुसरीकडे शेतमजुरांनाही शेतीची कामे उपलब्ध नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या गंभीर परिस्थितीत शेतकरी व शेतमजुरांच्या कुटुंबांना पुढील उत्पन्न हाती येईपर्यंत दरमहा १० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार संपूर्ण मदत तातडीने वितरित करावी आणि सोयाबीन पिकासाठी हेटरी विशेष आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. कामरगाव येथे सुरू झालेल्या या आंदोलनाला दिवसेंदिवस शेतकरी, शेतमजूर व नागरिकांचा पाठिंबा वाढत असल्याने प्रशासनासमोर आता या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.