मुंबई
ganeshotsav 2026 विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय झाला असून राज्यभर गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी आणण्यासाठी सकाळपासूनच लगबग सुरू आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला असून ढोल-ताशांचा गजर, सजावट आणि भक्तिमय वातावरणाने सर्वत्र चैतन्य निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदावी, अशी भावना या शुभेच्छांमधून व्यक्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्राच्या प्रगतीची घोडदौड अविरत सुरू राहावी आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील राज्यातील गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लंडन दौरा आटोपून एकनाथ शिंदे भारतात परतले आहेत. गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने त्यांनी नागरिकांना शुभेच्छा देत उत्सव आनंदात साजरा करण्याचे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गणरायाच्या आगमनाने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धी यावी, अशी प्रार्थना केली. शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पीक यावे, कष्टकरी वर्गाच्या मेहनतीला यश मिळावे आणि युवक-युवतींच्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा उत्सव नसून सामाजिक एकोपा, लोकसहभाग आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा सण असल्याचे त्यांनी म्हटले. सर्व समाजघटकांना सोबत घेत शिस्त आणि पर्यावरणाचे भान राखून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच श्रीगणरायाच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग आणखी वाढावा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवी ऊर्जा मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनीही देशवासीयांसह महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या मंगलदिनी प्रत्येकाच्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत आणि सर्वांचे जीवन आनंदी व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गणरायाच्या आगमनामुळे राज्यात आनंद, उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले. चैतन्याने भारलेल्या या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन आनंद साजरा करावा, असे आवाहन करत त्यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
गणरायाच्या आगमनामुळे राज्यभरातील गणेश मंडळे, घरे आणि सार्वजनिक ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून पुढील काही दिवस महाराष्ट्र गणेशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघणार आहे.