गणरायाच्या स्वागताला फुलांची उधळण

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |

पराग मगर
नागपूर, 
ganeshotsav-2026गणरायाच्या आगमनाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले असतानाच बाप्पाच्या सजावटीसह पूजेसाठी लागणाऱ्या फुलांना मागणी वाढली आहे. गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून, अवघ्या दोन दिवसांवर महालक्ष्मी उत्सव असल्याने महात्मा फुले फुल मार्केटमध्ये फुलांची आवक आणि खरेदी-विक्रीची लगबग वाढली आहे. विविधरंगी फुलांनी बाजार बहरला असून, ग्राहकांचीही मोठी गर्दी होत आहे.
 
ganehsa
गणेशमूर्तीच्या सजावटीपासून आरास, हार-तुरे आणि पूजेसाठी विविध फुलांची मागणी होत आहे. त्यात गुलाबाला विशेष पसंती मिळत असून, सध्या गुलाबाचा दर ५०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. गुलाबांच्या हारांनाही मोठी मागणी असून, मोठ्या हाराची किंमत सुमारे १ हजार रुपये, तर लहानातील लहान साध्या हारांची किंमतही २०० रुपये आहे.
शेवंतीच्या फुलांनाही गणेशोत्सवात विशेष मागणी असते. जांभळी आणि पिवळी शेवंती १८० रुपये किलो, तर पांढऱ्या शेवंतीचा दर १२० रुपये किलो आहे. पूजेसाठी तसेच सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या रुद्राक्ष फुलालाही ग्राहकांकडून मागणी असून, त्याचा दर २०० रुपये किलो आहे.
 
दरम्यान, सर्वसामान्यांच्या आवडीचे आणि गणेशोत्सवातील सजावटीत आवर्जून वापरले जाणारे झेंडूचे फूल तुलनेने स्वस्त आहे. झेंडूचा दर सध्या ५० ते ८० रुपये किलो आहे. त्यामुळे हार, तोरण तसेच गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी झेंडूला ग्राहकांची पसंती कायम आहे. गणेशोत्सवाबरोबरच महालक्ष्मी उत्सवासाठीही फुलांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार असल्याने पुढील दोन दिवस बाजारातील उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता फूल विक्रेत्यांनी व्यक्त केली. घरगुती गणेशोत्सव, सार्वजनिक मंडळांच्या सजावटी तसेच महालक्ष्मी पूजनासाठी नागरिकांकडून विविध प्रकारच्या फुलांची खरेदी केली जात आहे.
 
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी फुलबाजार फुलांनी अक्षरशः बहरला असून, पुढील दोन दिवस महालक्ष्मीच्या स्वागतासाठीही फुलांची मागणी वाढणार आहे. फूल विक्रेते यश पराते यांनी फुलांचे सध्याचे दर आणि वाढलेल्या मागणीची माहिती दिली.