दुसऱ्या टी-२०त वैभवला संधी मिळणार?

वैभव सूर्यवंशीसाठी कर्णधाराचा धडाकेबाज निर्णय

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
मुंबई,
ind-vs-afg-2nd-t20भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 15 सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यापूर्वी सर्वांच्या नजरा भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनकडे लागल्या आहेत. युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या टी-20 मध्ये संधी मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पहिल्या सामन्यात वैभवला संघात स्थान मिळाले नव्हते. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली. मात्र, संजूला या संधीचा फायदा उठवता आला नाही.
 
cricket
झिम्बाब्वेविरुद्धच्या मागील टी-20 मालिकेत वैभव सूर्यवंशीने शानदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या कामगिरीसाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने वैभवला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीवेळी त्याला संघातून का वगळण्यात आले, याबाबत अय्यरने कोणतेही विशेष कारण सांगितले नाही.
 
पहिल्या सामन्यात वैभव खेळत नसला तरी तो मैदानावर दिसला. तो संघासाठी पाणी घेऊन जाताना दिसला आणि त्याला पाहताच प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला. सोशल मीडियावरही वैभवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याची चर्चा रंगली. आता दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळणार की पुन्हा एकदा बेंचवर बसावे लागणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.