पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी घरोघरी आशीर्वाद दिवा लावा
भारतीय जनता पार्टीचे आवाहन
दिनांक :14-Sep-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
नवी दिल्लीpm modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबरला असलेला वाढदिवस यावेळी वेगळ्या पध्द्तीने साजरा करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. १७ सप्टेंबरला सायंकाळी ६ ते ७ या वेळात देशवासीयांनी आपल्या घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद म्हणून दिवा लावण्याचे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी केले आहे. मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही नवीन यांनी देशवासीयांना केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाला तसेच सरकारप्रमुख म्हणून कारकीर्दीला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यावेळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ७ ऑक्टोबर २००१ मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ७ ऑक्टोबर २०२६ ला त्याला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. या २५ वर्षाच्या प्रवासात मोदी यांनी १३ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले, तर पंतप्रधान म्हणून त्यांची १२ वर्षे म्हणजे एक तपही पूर्ण झाले आहे.
जनसेवा ते देशसेवा हा मोदी यांच्या २५ वर्षाच्या प्रवासाचा मूलमंत्र होता, याकडे लक्ष वेधत नितीन नवीन म्हणाले की, मोदी यांनी आपल्या नेतृत्वात देशाला नवीन दिशा आणि ताकद दिली. विकसित भारत २०४७ च्या दिशेन आगेकूच करण्याची प्रेरणा मोदी हे सातत्याने देत आहेत.
मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा १७ सप्टेंबरपासून १७ ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान देशभर राबवणार आहे, याकडे लक्ष वेधत नवीन म्हणाले की, या दरम्यान देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याची सुरुवात १७ सप्टेंबरला मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होणार आहे, यादिवशी देशभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. याच दिवशी सायंकाळी आशीर्वाद दिवा घराघरात लावला जाणार आहे. २ ऑक्टोबरला स्वच्छता अभियान राबवले जाणार असून देशभर पदयात्रा आणि मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे.