पुन्हा जरांगे पाटलांना 'झटका' थेट पोलिसांचा नकार

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
मुंबई

manoj jarange patil मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी पुन्हा एकदा पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी दुसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी तोही अर्ज फेटाळल्याने मराठा आंदोलकांना पुन्हा धक्का बसला आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर आझाद मैदान वगळून अन्य पर्यायी ठिकाणी आंदोलनासाठी नव्याने अर्ज केल्यास, त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
 

manoj jarange patil gets setback as mumbai police deny permission for azad maidan protest 
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची दिशा स्वीकारली आहे. गेल्या 17 दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर येऊन आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे नियमानुसार परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी सुरुवातीपासूनच या आंदोलनाला परवानगी देण्यास नकार दिला. त्यानंतर जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडून पुन्हा परवानगी मागण्यात आली. दुसऱ्यांदा केलेला अर्जही पोलिसांनी नामंजूर केला आहे.
दक्षिण मुंबईत मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यास सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था तसेच दैनंदिन वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यताही पोलिसांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे. याचबरोबर 14 ते 26 सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव सुरू असून या काळात मुंबईत भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सध्या सुरू असलेले आंदोलन थांबवावे, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सोबत असून राज्य सरकारही आपल्या मागण्यांच्या बाजूने आहे. सरकारमधील मंत्री आणि आमदारदेखील सोबत असल्याचे सांगत, आगामी काळात जरांगे यांच्या मागण्या निश्चितपणे पूर्ण केल्या जातील, असा दावा रवी राणा यांनी केला.
मुंबईत सध्या गणपती बाप्पाचे आगमन झाले असून अशा परिस्थितीत शहरात येऊन आंदोलन करण्यापेक्षा ते काही काळ स्थगित करावे, असेही रवी राणा यांनी म्हटले आहे. आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जाऊ नये आणि त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सवाच्या काळात कोणी विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर महाराष्ट्रातील जनता ते पाहत आहे, असेही रवी राणा यांनी सांगितले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी किमान दहा दिवस प्रतीक्षा करावी आणि त्यानंतर आंदोलनाबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.