भोंसला पॅलेसमध्ये पालखीतून ‘श्रीं’चे आगमन

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
पराग मगर
 
 
नागपूर,
nagpur bhosale palace ganeshotsav नागपूरच्या राजघराण्याच्या ऐतिहासिक आणि समृद्ध परंपरेचे दर्शन घडविणारा श्री गणेशोत्सवाचा सोहळा सिनियर भोंसला पॅलेस येथे सोमवारी भक्तिभावात पार पडला. इसवी सन १७२८ पासून जपल्या जात असलेल्या परंपरेनुसार यंदा २९८ व्या वर्षी श्री गणरायाचे पारंपरिक पद्धतीने पालखीतून आगमन झाले. त्यानंतर विधिवत पूजाअर्चा आणि धार्मिक विधी पार पाडून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
 

nagpur bhosale palace ganeshotsav lord ganesha arrives in palanquin, 298-year-old royal tradition continues 
नागपूरचे राजे मुधोजी भोंसले यांच्या सिनियर भोंसला पॅलेस या निवासस्थानी दरवर्षी गणरायाचे आगमन पारंपरिक पद्धतीने केले जाते. या सोहळ्यात राजघराण्याची संस्कृती, धार्मिक श्रद्धा आणि ऐतिहासिक वारसा यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. पालखीतून गणरायाचे आगमन हा या उत्सवाचा प्रमुख आकर्षणबिंदू ठरतो.
नागपूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाशी भोंसला राजघराण्याचे नाते दीर्घकाळापासून जोडलेले आहे. त्यामुळे सिनियर भोंसला पॅलेस येथील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता नागपूरच्या ऐतिहासिक वारशाची जपणूक करणारी परंपरा म्हणूनही पाहिला जातो.
 
 

विशेष पगडी ही राजपरंपरेची ओळख
भोंसला पॅलेसमधील गणरायाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राजघराण्याच्या परंपरेनुसार श्री गणरायाला विशेष पगडी परिधान केली जाते. पारंपरिक वेशभूषेतील ही मूर्ती राजघराण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानली जाते. गेल्या अनेक पिढ्यांपासून गणरायाच्या मूर्तीचे रंग, आकार आणि स्वरूप यामध्ये सातत्य राखण्याची परंपरा जपली जात असल्याचे सांगितले जाते. काळ बदलला, उत्सवाचे स्वरूप बदलले; मात्र भोंसला पॅलेसमधील श्रींच्या मूर्तीचे पारंपरिक स्वरूप कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या गणेशोत्सवाला ऐतिहासिक वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.