अनिल कांबळे
नागपूर
nagpur hiccup bar raid एस्कॉर्ट पथकाने सदर परिसरातील हिचकी बार अँड रेस्टॉरंटवर मध्यरात्री छापा टाकला. येथे मर्यादा ओलांडून उच्च क्षमतेने डीजेचा तीव्र आवाज सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी बारचा मॅनेजर अभय केशव विरखेडे (४४, कोलते ले-आऊट, मानकापूर) आणि डी.जे. आॅपरेटर दीप शंकरराव मोरे (२२, श्रीकृष्णनगर, वाठोडा) या दोघांना ताब्यात घेत डीजेचे साहित्य जप्त केले. सदर पोलिसांचे हद्दीतील अवैध धंद्यासह हुक्का पार्लरवर नियंत्रण नाही. त्यामुळे सदर पोलिसांचा वचक संपल्याची किंवा अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‘पार्क एव्हेन्यू’ इमारतीमधील ‘हिचकी बार अँड रेस्टॉरंट’ आहे. येथे शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अत्यंत मोठ्या आवाजात डी.जे. वाजवला जात असल्याची बातमी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने एस्कॉर्ट पथकाला घटनास्थळी जाऊन खातरजमा करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिस पथकाने पार्क एव्हेन्यू इमारतीच्या १३ व्या मजल्यावरील रेस्टॉरंटमध्ये छापा टाकला. त्यावेळी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून ध्वनितीव्रता मोजणी यंत्राद्वारे (साऊंड लेव्हल मीटर) तपासणी केली असता, डी.जे.च्या आवाजाची तीव्रता १००.६ डेसिबल नोंदवली गेली. ही तीव्रता शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अत्यंत जास्त असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ डी.जे. बंद पाडून आरोपी डी.जे. आॅपरेटर दीप मोरे आणि बारचा मॅनेजर अभय विरखेडे या दोघंना ताब्यात घेतले. पोलिसांकडून घटनास्थळावरून डी.जे.चे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस आयुक्तांनी ध्वनिप्रक्षेपणाबाबत जारी केलेल्या मनाई आदेशाचे थेट उल्लंघन केल्याप्रकरणी अनुप लोलुसरे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त साहित्यासह दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.