इस्लामाबाद
pakistan petrol पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानातील जनतेला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रविवारी विशेष मदत योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल खरेदीवर प्रतिलिटर १०० पाकिस्तानी रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ केवळ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल, अशा पद्धतीने तिची आखणी करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर सध्या प्रतिलिटर ३७० पाकिस्तानी रुपयांहून अधिक झाले आहेत.
पंतप्रधान शरीफ यांच्या घोषणेनुसार, मोटारसायकल, रिक्षा आणि छोट्या कार वापरणाऱ्या नागरिकांना या योजनेचा मुख्य लाभ मिळणार आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, त्याचा थेट परिणाम पाकिस्तानातील पेट्रोलच्या दरांवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, शहबाज शरीफ यांनी कठीण परिस्थितीत सरकार जनताेला एकटे सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. योजनेनुसार दुचाकी आणि तीनचाकी वाहनधारकांना दर महिन्याला जास्तीत जास्त २० लिटर पेट्रोल खरेदीवर प्रतिलिटर १०० पाकिस्तानी रुपयांची सबसिडी मिळणार आहे. त्याचप्रमाणे, ८०० सीसीपर्यंतच्या छोट्या कारच्या मालकांना दर महिन्याला जास्तीत जास्त ३० लिटर पेट्रोलवर प्रतिलिटर १०० पाकिस्तानी रुपयांची सवलत दिली जाणार आहे. या सबसिडीनंतर लाभार्थ्यांना पेट्रोलसाठी प्रतिलिटर सुमारे २७० पाकिस्तानी रुपये मोजावे लागतील.
पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा सध्याचा दर ३७० पाकिस्तानी रुपयांपेक्षा अधिक असून, जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारामुळे देशांतर्गत पेट्रोलच्या दरातही सातत्याने बदल होत आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्यामुळे जनतेवर पडणाऱ्या आर्थिक ताणाची सरकारला पूर्ण जाणीव असल्याचे शरीफ यांनी योजना जाहीर करताना सांगितले.
ही मदत योजना सुरुवातीला इस्लामाबादमध्ये सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्रीपासून लागू केली जाणार आहे. त्यानंतर बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण पाकिस्तानमध्ये ती लागू होईल. त्यामुळे देशभरातील पात्र वाहनधारकांना या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांच्या नोंदणीची प्रक्रिया रविवारीच सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मोटारसायकल, रिक्षा आणि छोट्या कारची नोंदणी करण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान शरीफ यांनी देशातील प्रांतीय सरकारांचे आभार मानले आहेत.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत असताना पाकिस्तान सरकारवर जनतेच्या आर्थिक अडचणींबाबत मोठी टीका होत होती. या पार्श्वभूमीवर शहबाज शरीफ यांनी ही सबसिडी योजना जाहीर केली आहे. त्यामुळे वाढत्या इंधन दरांचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या मोटारसायकलस्वार, रिक्षाचालक आणि छोट्या कारधारकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.