ऐन गणेशोत्सवात पेट्रोल-डिझेल भडकणार

सौदीतील तेल पाईपलाईनवर भीषण हल्ला

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
दुबई
petrol, diesel prices जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भडका उडाला असून अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सौदी अरेबियाच्या पूर्व-पश्चिम तेल पाइपलाइनवर हुती बंडखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर ही पाइपलाइन बंद करण्यात आली आहे. यामुळे जगातील चार टक्के तेल पुरवठा धोक्यात आला आहे. या संघर्षाच्या घडामोडीनंतर सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव 2.90 डॉलरने (2.77%) वाढून 107.51 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. तर अमेरिकन डब्लूटीआय क्रूड 2.27 डॉलरने (2.27%) वाढून 102.32 डॉलर प्रति बॅरल झाले. बाजार उघडताच दोन्ही कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 3 टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली.
 
petrol
सागरी वाहतुकीवर वाढता तणाव
आखाती देश आणि इराण यांच्यात सोमवारी ’स्ट्रेट ऑफ होर्मुज’बाबत होणारी महत्त्वाची बैठक तहकुब करण्यात आल्याची माहिती ओमानने दिली आहे. दुसरीकडे, हूती बंडखोर हे पेरिम बेटापर्यंत पोहोचल्याने ’बाब-अल-मंदेब’ या अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी व तेल वाहतूक सागरी मार्गावरील धोके अधिक वाढले आहेत. त्यातच होर्मुजच्या खाडीत एका जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती ब्रिटनच्या सागरी सुरक्षा एजन्सीने दिली आहे. या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली असून कर्मचाऱ्यांना तेथून तातडीने बाहेर काढावे लागले. इराणने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या किनाèयाजवळ एका इराणी व्यावसायिक जहाजालाही लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार कर्मचारी जखमी झाले आहेत.

ओपेकने काय सांगितले?
सऊदी अरबच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणी जाजान प्रांतात हूतींच्या हल्ल्यांमुळे घरे आणि एका मशिदीचे मोठे नुकसान झाले. हूती बंडखोरांनी शेजारच्या प्रांतातील सऊदी लष्करी तळावरही हल्ला केल्याचा दावा केला आहे. यापूर्वीच सऊदी अरबने ओपेकला माहिती दिली होती की, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या शत्रुत्वामुळे त्यांच्या निर्यातीवर मोठा ताण आला असून गेल्या महिन्यात त्यांचे कच्चे तेल उत्पादन 1990 नंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर घसरले होते.
कच्च्या तेलाच्या दरात उसळण झाल्याने भारतातही याचा परिणाम होण्याची भीती आहे. कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरच्या वर राहिल्यास भारताचे आयात बिल प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील तेल कंपन्यांवर मोठा दबाव येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवणे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त ठरेल. जगभरातील अनेक देशांमध्ये गेल्या आठवड्यात तेलाचे दर वाढले असून शेजारील पाकिस्तानातही पेट्रोलचे दर 5 रुपयांनी महागले आहेत.