रिसोड्र,
reel in tehsil officeशासकीय नियमांचे उल्लंघन करून तहसील कार्यालयात वैयक्तिक प्रसिद्धीसाठी आणि स्वयंप्रशंसेसाठी ‘सिनेमॅटिक रील्स’ तयार करणार्या वाशीम जिल्ह्यातील रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या या कृतीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त, अमरावती यांना दिले आहेत.

रिसोड तहसील कार्यालयात शासकीय खुर्चीवर बसून, फायलींवर सह्या करताना आणि फिल्मी स्टाईलने रील्स बनवून ते स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. जनसेवेचे केंद्र असणारे तहसील कार्यालय प्रशासकीय कामकाजाऐवजी वैयक्तिक प्रसिद्धीसाठी ‘शूटिंग स्टुडिओ’सारखे वापरले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला. महसूल यंत्रणेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेले शासकीय कर्मचारी आणि चक्क कोतवालांना अधिकार्यांच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी राबवले जात असल्याची चर्चा रंगली होती. शासकीय कर्तव्ये बाजूला ठेवून कॅमेरा सांभाळणे आणि रील्सचे नियोजन करणे यामुळे प्रशासकीय शिस्तीचा पुरता बोजवारा उडाला होता. याप्रकरणी विविध प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर हा प्रकार शासनाच्या निदर्शनास आला. याबाबतचा प्रस्ताव महसूल मंत्री तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात आला होता.
महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या शासकीय पत्रानुसार, प्रतीक्षा तेजनकर यांनी रिसोड तहसीलदार पदावर कार्यरत असताना केलेल्या संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत तपासणी करण्यात यावी आणि या चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्तांच्या अभिप्रायासह एका महिन्याच्या आत शासनास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
छायाचित्र - प्रतीक्षा तेजनकर