ऋषी बाबांनी दिलेले कोळसे झाले मोती!

ऋषीबुवा देवस्थानात आज ऋषी पंचमी उत्सव

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
गोपाल चिकाटे
तळेगाव (श्या. पंत)
rishi panchami येथून अडीच किलोमीटर अंतरावर मौजा तळेगाव जुनोनाच्या मध्यभागी घनदाट जंगलात, निसर्गाच्या कुशीत वनजल पर्यटनस्थळ असून त्याच परिसरात प्राचीन ऋषीबुवा देवस्थान आहे. या देवस्थातील ऋषीबुवांचे चमत्कार आजही चर्चिले जातात. गुराख्याला कोळसे दिले आणि घरी जाऊन बघितले तर ते मोती झालेले होते, असे अनेक चमत्कार भक्तांच्या गाठीशी असून मंगळवारी, १५ सप्टेंबरला ऋषी पंचमीला येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

rishi panchami
येथील ज्येष्ठ नागरिक चंपत पाचघरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते लहानपणापासून या देवस्थानमध्ये पुजेकरिता जात होते. तेथे पहाडाला लागून ऋषी महाराजांची मूर्ती आहे. तेथे बाणांच्या खुणा आहेत. परंतु, त्याविषयी फारशी माहिती कुणालाच नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण लहानपणापासून या जंगल परिसरात जात होतो. आपल्यासोबत गंगाराम इंगळे आणि गावातील मोजके नागरिक पुजेकरिता येत होते. ती पुरातन तपोभूमी असून तेथे एक ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे गायी होत्या. येथील एक गायकी महाराजांच्या गायी दररोज चारत होता. महाराजांना गायकी म्हणाला, मी दररोज गायी चारतो, पण मला कोणतीच मदत मिळत नाही. भक्तीने गायी चारणाऱ्या गुराख्याचे वाक्य ऐकताच महाराजांनी पेटत्या धुनीतील काही कोळसे काढून त्याच्या घोंगडीत टाकले. ते घरी आणले असता त्या कोळशांचे मोती झाले होते, असे गावातील वयोवृद्ध सांगतात. त्यामुळे महाराजांवर परिसरातील नागरिकांची श्रद्धा अजून दृढ झाली. तेथे आजही त्याच पहाडाला लागून ऋषीबुवांची मूर्ती आहे. तेथे दरवर्षी महाशिवरात्री, नागपंचमी, वैशाख पौर्णिमा, ऋषी पंचमी या पाच सणांचे गावकरी आयोजन करतात.
 
पहाडाच्या बाजूला एक मोठी विहीर आणि कुंड होते. विहिरीला पाणी बाराही महिने मुबलक होते. त्या रस्त्याने शेतकरी जाणे-येणे करीत होते. परंतु, कालांतराने तो रस्ताच चोरीला गेला. दरम्यान, येथे येण्याकरिता रस्ता करून देण्यात यावा या मागणीचे निवेदन गावकऱ्यांसह आपण आमदार सुमित वानखडे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. वरच्या बाजूला राष्ट्रीय महामार्गावर हनुमानाचे जागृत देवस्थान आहे. निसर्गरम्य ऋषीबुवा देवस्थानात ऋषी पंचमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम उद्या, १५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.