अनिल कांबळे
नागपूर,
murdered in itwari इतवारी परिसरात वाळू व्यावसायिकाची मित्रांनीच दगडाने ठेचून आणि चाकूने भोसकून खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. मनीष चंद्रशेखर मोहिते (३८, रा. महाल) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी तहसील पोलिसांनी दोन तासांत आरोपी निखिल चव्हाण, कुणाल झाडे आणि विनय पौनीकर या तिघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मनीष हा त्याचे मित्र निखिल, कुणाल आणि विनय यांच्यासोबत दारु प्यायला गेला होता. रात्री दहाच्या सुमारास मनीषने मोठा भाऊ रोशनला फोन करून झेंडा चौकातील व्हाइट हाउस बारमध्ये बोलावले. त्यानेसुद्धा मनीष व त्याच्या मित्रांसह मद्यपान केले आणि निघून गेला. त्यानंतर मनीष व निखिल एका अॅक्टिव्हावर, तर कुणाल व विनय दुसऱ्या अॅक्टिव्हावरून तेथून निघून गेले. मनीष घरी न परतल्याने रोशनने रात्री त्याला फोन केला. त्यावेळी मनीष चितारओळी परिसरातील ताजणेकर मूर्तिकार यांच्या दुकानात असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर रोशन झोपला. इतवारी पोस्ट ऑफिसजवळील कसार भवनसमोरील चहाच्या टपरीत मनीषचा खून झाल्याची माहिती रोशनला मिळाली. निखिल, कुणाल आणि विनय यांनी संगनमत करून मनीषवर शस्त्र व दगडाने हल्ला करून त्याची हत्या केली.murdered in itwari त्याच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मनीषच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पैशांच्या व्यवहारातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, कुणालने एक खाण भाडेतत्त्वावर घेतल्याची चर्चाही परिसरात आहे. या सर्व बाबींची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.