अमरावती
fda action मार्डी रोड येथील संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे भोजनालय विनापरवाना सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत उघडकीस आले आहे. येथूनच रुग्णांना जेवण दिले जाते व त्यांचे नातेवाईक स्वत:साठी येथीलच जेवण घेत होते. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे. भोजनालय चालक सविता पुरुषोत्तम राऊत यांना अन्न व औषध प्रशासन विभागाने नोटीस बजावून भोजनालय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
अन्नसुरक्षा अधिकारी अदिती देशमुख यांनी १३ सप्टेंबरला संबंधित भोजनालयाची तपासणी केली. यावेळी अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला वैध परवाना किंवा नोंदणी न घेता भोजनालय सुरू असल्याचे निदर्शनास आले. अन्नसुरक्षा व मानदे अधिनियम २००६ तसेच संबंधित नियम व विनियमांनुसार अन्नपदार्थांचे उत्पादन, विक्री, साठवणूक किंवा वितरण करण्यापूर्वी परवाना अथवा नोंदणी घेणे बंधनकारक आहे. सुमारे आठ वर्षांपासून हे भोजनालय विनापरवाना सुरू आहे. विशेष म्हणजे विश्वस्तांचे याकडे दुर्लक्ष होते.
परवाना किंवा नोंदणी मंजूर होईपर्यंत संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय करू नये, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्देशांचे उल्लंघन केल्यास अन्नसुरक्षा व मानदे अधिनियमाच्या कलम ५५ अंतर्गत कारवाई व शिक्षेस सामोरे जावे लागू शकते, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. एफडीएकडून सलग होणाऱ्या कारवाईमुळे अन्न व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
जागा देताना परवानगी नाही
जागा भाड्याने देताना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ३६ (१) (बी) अन्वये धर्मादाय आयुक्त किंवा त्यांच्या अधिपत्याखालील कोणत्याही प्राधिकरणाची पूर्व मंजुरी घ्यावी लागते. सदर भोजनालयाला जागा देताना तशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे २०२४-२५ च्या लेखा परीक्षणादरम्यान समोर आले होते, अशी माहिती मिळाली आहे.