सिद्धीविनायकाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
सेलू
siddhivinayak-temple-at-keljhar विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक म्हणून केळझर येथील सिध्दी विनायक प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवात पहिल्याच दिवसापासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली आहे. केळझर नागपूरवरून ५२ किलोमीटर तर वर्धेवरुन २६ किलोमीटर अंतरावर टेकडीच्या कुशीत बसलेले आहे. मंदिर वर्धा-नागपूर मुख्य मार्गावर अंदाजे एक फर्लांग अंतरावर उत्तरेकडे उंच टेकडीवर आहे.
 
ganapati
वशिष्ठ पुराणाप्रमाणे ऐतिहासिक महत्त्व असून या गावाचे नाव एकचक्रनगर असल्याचा वशिष्ठ पुराण आणि महाभारतात उल्लेख आढळतो. पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव ’वरदविनायक’ असून वर्धा नदीचे ’वरदा’ असे नाव आहे. या गावात कुंतीपुत्र पांडव वास्तव्याला असताना बकासूर नावाच्या राक्षसाला मारल्याचा उल्लेख महाभारतामध्ये असून ते ठिकाण वर्धा नागपूर मुख्य मार्गावर गावाच्या आग्नेय बाजूला बकासुर, तोंड्या राक्षसाचे मैदान म्हणून प्रचलित आहे.
 
टेकडीवर गणपतीचे मंदिर आहे. वरदविनायक गणपतीची मूर्ती चार फूट सहा इंच उंच असून व्यास १४ फूट आहे. १९९३ ला या मंदिरात जीर्णोद्धाराच्या कामास सुरुवात झाली. १९९४ मध्ये महाशिवरात्रीच्या अगोदर खोदकामात शिवलिंग मिळाले. याविषयी शिवलीला अमृताच्या अखेरच्या अध्यायात एकचक्रानगरात ज्योर्तिलिंग असल्याची नोंद आहे.
गणेश उत्सवानिमित्त मंदिरावर केलेल्या विद्युत रोषणाईने मंदिर व परिसरात झगमगाट दिसून येत असून ही विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी भाविकांचे आकर्षण बनले आहे. मंदिरात टाळ, विणा, भागवत, भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
नवसाला पावणारा
येथे दर चतुर्थीला सकाळपासूनच भाविकांची गर्दी असते. सकाळी ६ वाजता होणार्या आरतीला नागपूर, चंद्रपूर, वर्धा येथील काही भाविक नित्यनेमाने येतात. नवसाला पावणारा गणपती अशी भक्तांची श्रद्धा आहे.