बसची अनेक वाहनांना ५० हून अधिक जखमी

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
तेलंगणा
telangana road accident तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील शमशाबाद येथे बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण साखळी अपघात झाला. कंटेनर ट्रकने दुभाजकावरील वीजेच्या खांबाला धडक दिल्यानंतर काही वेळातच समोरून येणारी खासगी बसही त्याच खांबावर आदळली. त्यानंतर बसने रस्त्यालगत उभ्या असलेल्या मारुती अर्टिगा, मारुती ओमनी, मारुती स्विफ्ट आणि एका मोटारसायकलला धडक दिली. एवढ्यावरच न थांबता ही बस ‘बालाजी भवन’ हॉटेल आणि शेजारील पानाच्या दुकानात घुसली. या अपघातात ५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
 

telangana road accident bus crashes into multiple vehicles and hotel, over 50 injured 
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादहून बंगळुरूकडे जाणारा एक कंटेनर ट्रक शमशाबादजवळ महामार्गाच्या दुभाजकावर असलेल्या वीजेच्या खांबाला धडकला. त्याचवेळी समोरून येणारी ‘सेवन हिल्स प्रायव्हेट ट्रॅव्हल्स’ची बसही त्या खांबावर आदळली. त्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने जवळ उभ्या असलेल्या मारुती अर्टिगा, मारुती ओमनी, मारुती स्विफ्ट आणि एका मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही वाहने धडकून बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या ‘बालाजी भवन’ हॉटेलमध्ये घुसली. बसने हॉटेललगत असलेल्या पानाच्या दुकानालाही धडक दिली.
अपघाताच्या वेळी हॉटेलच्या आत चूल पेटलेली होती. बसच्या धडकेनंतर चुलीमुळे अचानक आग लागली. मात्र, प्रसंगावधान राखत स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या साखळी अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला असून, मारुती अर्टिगाच्या चालकालाही दुखापत झाली आहे. एकूण ५० हून अधिक जणांना किरकोळ दुखापती झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी जखमींना तातडीने वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, बसचालकाची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, पुणे-बंगळुरू महामार्गावरही अशाच प्रकारचा भीषण अपघात घडला आहे. जांभुळवाडी परिसरात एका ट्रकने टेम्पोला धडक दिल्यानंतर इतर वाहनांनाही धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणारा ट्रक त्याच दिशेने पुढे जात असलेल्या टेम्पोला धडकला. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि तेथे दोन कारला धडकली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. जखमींमधील डझनहून अधिक जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.