काळीज पिळवटणारी दुर्घटना; घराला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
बेळगाव
belagavi fire देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण असतानाच गणेश चतुर्थीच्या रात्री बेळगावमध्ये काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. चव्हाट गल्ली परिसरातील एका दुकानाला आणि घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही क्षणांत आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
 

 belagavi fire 
स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दमोने यांच्या घरातून अचानक आगीच्या तीव्र ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या. पाहता पाहता आगीने संपूर्ण घराला वेढा घातला. आग इतक्या वेगाने पसरली की, घरातील रहिवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण दुर्घटनेत गजानन दमोने (६५), शारदा दमोने (४५), भारती दमोने (५०) आणि रोशन दमोने (२१) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या आगीत प्रिया दमोने (२८) आणि गंगा दमोने (२५) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.घरातील फ्रिजचा अचानक स्फोट झाल्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीने क्षणार्धात घेतलेल्या रौद्ररूपामुळे घरातील सामानासह मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सर्व काही जळून खाक झाले.दमोने कुटुंबीय मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. सणाच्या उत्साहात असलेल्या चव्हाट गल्ली परिसरात ही दुर्दैवी घटना घडल्याने नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस तसेच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. शॉर्टसर्किट, फ्रिजमधील बिघाड किंवा अन्य कारणामुळे आग लागली का, याचा तपास केला जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना गेल्या एक-दोन दिवसांत विविध ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांनी या आनंदावर विरजण घातले आहे. गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी मुंबईहून कोकणाच्या दिशेने रवाना झाले असून, या प्रवासादरम्यान काही ठिकाणी भीषण अपघात झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्घटनांमुळे अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बेळगावातील दमोने कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्घटनेनेही परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.