फुलांची आरास, मोदकांचा नैवेद्य अन् घरी बाप्पा!

लिटन दासच्या घरी विराजमान झाले बाप्पा!

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
ढाका,
litton dass बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर तेथील हिंदू क्रिकेटपटू लिटन दास चर्चेत आला आहे. लिटन दासने आपल्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली असून पत्नी देबोश्री सोंचितासोबत गणरायाची पूजा केली. फुलांनी सजवलेल्या गणपतीच्या मूर्तीसमोर मोदकांचा नैवेद्य ठेवण्यात आला असून, या सोहळ्याचे फोटो त्याने समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत.
 
litton dass
 
लिटन दासने आपल्या पोस्टमध्ये प्रेम, भक्ती आणि कृतज्ञतेने गणपती बाप्पाचे घरात स्वागत केल्याचे म्हटले आहे. बाप्पाने घराला सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मकतेचा आशीर्वाद द्यावा, तसेच आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना त्याने केली आहे. याआधीही लिटन दासने जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. २०२२ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी त्याने दुर्गापूजेच्या शुभेच्छा दिल्यानंतर बांगलादेशातील काही कट्टरपंथीयांनी त्याच्यावर टीका केली होती. त्याला धर्मांतर करण्याचा सल्ला देण्यासोबतच अपशब्दांचाही वापर करण्यात आला होता. मात्र, बांगलादेशातील काही नागरिकांनी त्याला पाठिंबाही दिला होता.
 
दरम्यान, बांगलादेश आणि भारतातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी क्रिकेटपटूंना आयपीएल २०२६ मध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतात झालेल्या टी-२० विश्वचषकावर बहिष्कार टाकला होता. सुमारे १७ कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशमध्ये जवळपास ८ टक्के हिंदू असून, हिंदूंची संख्या सुमारे १.३ कोटी असल्याचे या माहितीत नमूद करण्यात आले आहे. १९४७ मध्ये फाळणीनंतर बांगलादेश पाकिस्तानचा भाग होता आणि १९७१ मध्ये स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. मागील काही काळात हिंदूंची घरे जाळणे तसेच काही सेलिब्रिटींना लक्ष्य करण्याच्या घटना वाढल्याचा दावा केला जात आहे.