शैक्षणिक व कौटुंबिक तणावातून आत्महत्या
भद्रावती,
bhadravati news वैद्यकीय क्षेत्रात करिअर करून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्या 26 वर्षीय होतकरू तरुणाने शैक्षणिक व कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी चेक बरांज मानोरा येथे घडली. आदित्य दीपक मेश्राम (26) असे मृत तरुणाचे नाव आहे.
गावालगत मांगली रोड परिसरातील एका शेतात सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. आदित्य हा अत्यंत हुशार, अभ्यासू आणि महत्त्वाकांक्षी तरुण म्हणून ओळखला जात होता. वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, काही काळापासून सुरू असलेल्या शैक्षणिक व कौटुंबिक तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
आदित्यच्या मृत्यूची वार्ता कुटुंबियांना समजताच आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचे वडील दीपक मेश्राम हे भद्रावती नगर परिषदेत वाहनचालक आहेत. पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. शोकाकुल वातावरणात आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.