धानोरा,
dhanora news एकीकडे देश प्रगतीचे आणि डिजिटल क्रांतीचे दावे करत असताना, गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या सालईटोला या गावात अत्यंत विदारक आणि संतापजनक चित्र समोर आले आहे. स्वातंत्र्याला तब्बल 78 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या गावाला जोडणारा रस्ता उपलब्ध नसल्याने, एका ग्रामस्थाच्या निधनानंतर त्याचा मृतदेह खाटेला (बाजेला) दोरीने बांधून, बांबूच्या साहाय्याने चिखल तुडवत मुख्य रस्त्यापर्यंत आणावा लागला.
तालुक्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सालईटोला गावात रस्ताच नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचणे ही तर फार दूरची गोष्ट ठरली आहे. गावात कोणाचा मृत्यू झाल्यास किंवा कोणी गंभीर आजारी असल्यास त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी गावकर्यांना कसरत करावी लागते.
गावात रस्त्याची सोय नसल्याने अंताराम तुलावी रा. दुधमाळा यांचा मृतदेह वाहून नेण्यासाठी गावकर्यांना बाजेला (खाटेला) दोरीने बांधावे लागले. त्यानंतर दोन बांबूंच्या सहाय्याने खांद्यावर उचलून शेतातील चिखल-पाण्यातून पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले. तेथून पुढील प्रवासासाठी एका चारचाकी वाहनाची व्यवस्था करावी लागली. प्रशासनाच्या आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ही भीषण वेळ गावकर्यांवर ओढवली आहे.
या संदर्भात गावकर्यांनी अनेकदा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि लोकप्रतिनिधींकडे पक्का रस्ता तयार करण्यासाठी निवेदने दिली. मात्र, प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. गावात कुणी आजारी पडले किंवा दगावले, तर आम्हाला जीव मुठीत धरून शेतातून प्रवास करावा लागतो. सरकार आणि प्रशासन आमचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल सालईटोला येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
गावातील मूलभूत हक्कांचा असा बट्ट्याबोळ झाला असताना लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी मात्र ढिम्म बसले आहेत. या धक्कादायक घटनेनंतर तरी स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायत जागी होऊन सालईटोला गावाला तत्काळ पक्का रस्ता मंजूर करणार की हा प्रश्न कागदावरच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.