उत्तर प्रदेश
divya mittal उत्तर प्रदेश कॅडरमधील चर्चित IAS अधिकारी दिव्या मित्तल यांच्या राजीनाम्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. खासगी कारणे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आयुष्यातील नव्या उद्देशाचा उल्लेख करत त्यांनी ३० ऑगस्ट रोजी राजीनामा दिला होता. सोमवारी रात्री सुमारे ११ वाजता त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत राजीनामा मंजूर झाल्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी कवी जयशंकर प्रसाद यांच्या ‘चंद्रगुप्त’ या प्रसिद्ध नाटकातील, “प्रशस्त पुण्य पंथ आहे, पुढे चला, पुढे चला,” या आशयाची ओळ लिहिली.
राजीनामा मंजूर होण्याच्या दोन दिवस आधी दिव्या मित्तल यांनी माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर आपला फोटो शेअर करत, “पुढची वाट कठीण आहे... सद्बुद्धी दे आई,” असे लिहिले होते. त्यांच्या या पोस्टनंतर त्या आता कोणती नवी वाट निवडणार, याबाबत विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली होती.
२०१३ च्या बॅचच्या IAS अधिकारी असलेल्या दिव्या मित्तल यांनी सुमारे १३ वर्षे शासकीय सेवा बजावली. विशेष म्हणजे, राजीनामा देताना त्यांच्या सेवाकाळातील जवळपास १७ वर्षे अद्याप शिल्लक होती. दिव्या यांनी IIT दिल्लीमधून बीटेक, तर IIM बंगळुरूमधून MBAचे शिक्षण घेतले आहे. उच्च शिक्षणानंतर त्यांनी लंडनमध्ये चांगल्या पगाराची नोकरी स्वीकारली. मात्र, ती नोकरी सोडून भारतात परतत त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
दिव्या मित्तल यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करत भारतीय पोलीस सेवेत (IPS) प्रवेश मिळवला आणि त्यांना गुजरात कॅडर मिळाले. मात्र, IPS प्रशिक्षणाच्या काळातही त्यांनी IAS होण्याचे ध्येय कायम ठेवले. त्यासाठी त्यांनी तयारी सुरूच ठेवली आणि पुढील वर्षी, म्हणजे २०१३ मध्ये, IAS म्हणून निवड मिळवली. अवघ्या दोन वर्षांत UPSC परीक्षेत दोनदा यश मिळवत त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर, बस्ती आणि देवरिया या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी म्हणूनही दिव्या मित्तल यांनी काम पाहिले आहे. कठोर आणि स्पष्टवक्त्या अधिकारी अशी त्यांची प्रतिमा होती. कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणीच जाब विचारणे आणि फटकारणे यामुळेही त्या चर्चेत राहिल्या.
मे महिन्यात त्यांची देवरियाच्या जिल्हाधिकारीपदावरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची लखनऊ येथे महसूल विभागाच्या विशेष सचिवपदी नियुक्ती झाली. देवरियातून बदली होऊन त्यांना अद्याप सुमारे चारच महिने झाले होते. त्यानंतर त्यांनी शासकीय सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
दिव्या मित्तल यांचे पती गगनदीप सिंह हेदेखील शासकीय अधिकारी राहिले आहेत. ते २०११ च्या बॅचचे भारतीय व्यापार सेवा (ITS) अधिकारी होते. २०२२ मध्ये त्यांनीही सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. गगनदीप सिंह यांनी IIT दिल्लीमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक, तर IIM बंगळुरूमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे. २०१० मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची भारतीय व्यापार सेवेत निवड झाली होती. शासकीय सेवा सोडल्यानंतर गगनदीप सिंह यांनी ‘न्यूरोकॅप’ नावाची कंपनी सुरू केली. भारत तसेच परदेशातील व्यापाराशी संबंधित कामकाज ही कंपनी करते. दिव्या आणि गगनदीप यांची भेट लंडनमध्ये नोकरी करत असताना झाली. पुढे दोघांनी प्रेमविवाह केला. काही काळानंतर दोघांनीही लंडनमधील नोकऱ्या सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिव्या यांनी UPSCची तयारी सुरू केली आणि अल्पावधीतच दोनदा या परीक्षेत यश मिळवत प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.
आता IAS पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर दिव्या मित्तल आपल्या आयुष्याला कोणती नवी दिशा देतात, याकडे प्रशासकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.