सानपाड्यात स्फोटाचा हाहाकार!

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
नवी मुंबई,
explosion causes havoc in sanpada नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर-१ परिसरात मंगळवारी सकाळी एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटाने परिसर हादरला. प्रतीक्षा इमारतीमधील सागर फॅमिली रेस्टॉरंटमध्ये झालेल्या या स्फोटात दोन जण जखमी झाले असून त्यांना वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, सिलेंडरमुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
explosion causes havoc in sanpada
 
स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की रेस्टॉरंटच्या आसपासच्या सुमारे पाच ते सहा दुकानांचे शटर उडाले. स्फोटाच्या ठिकाणापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या सूरज हॉस्पिटलच्या खिडक्यांच्या काचा आणि भिंतींचेही नुकसान झाले. परिसरातील काही घरांच्या काचाही फुटल्याचे समोर आले आहे. स्फोटाचा आवाज जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. घटनेनंतर परिसरात मोठी घबराट निर्माण झाली.
 
स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात पोहोचवले. घटनास्थळी न्यायवैद्यक पथकानेही भेट देऊन आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. स्फोटानंतर आगीचा भडका उडाला नसल्याने अग्निशमन दलाला मोठी आग विझवण्याची कारवाई करावी लागली नाही. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण होईपर्यंत घटनेबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.