मुंबई
us ambassador sergio gor देशभरात सोमवारी उत्साह आणि भक्तिभावाच्या वातावरणात ११ दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गणरायाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गल्लीबोळ दुमदुमून गेले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक उत्साहात भाविकांकडून गणरायाची पूजा-अर्चा केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील लालबाग परिसर गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरला आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांनी गणरायाची विधिवत पूजा केली तसेच गणपतीच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. दर्शनानंतर त्यांनी लालबागमधील उत्साह आणि तेथील वातावरणाविषयी आपला अनुभव व्यक्त केला.
“हा अनुभव खरोखरच अद्भुत आहे. येथे येऊन मला सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. मला निमंत्रण मिळाल्याचा आनंद आहे. प्रत्येकाने येथे येऊन हा अनुभव घ्यायला हवा. इतके जिवंत आणि ऊर्जेने भरलेले वातावरण क्वचितच पाहायला मिळते. येथील ऊर्जा अविश्वसनीय आहे. तुम्ही येथे प्रत्यक्ष उपस्थित नसाल, तर हे शब्दांत सांगणे कठीण आहे. त्यामुळे अजून येथे आला नसाल, तर नक्की या,” असे सर्जियो गोर यांनी सांगितले.
यानंतर आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर केलेल्या पोस्टमध्येही त्यांनी मुंबईतील गणेशोत्सवाबद्दल भावना व्यक्त केल्या. ‘मुंबईचा राजा’ आणि ‘लालबागचा राजा’ यांचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला मोठा आनंद झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रद्धा आणि समुदायभावनेचे हे जिवंत प्रतीक असून ते सर्वांना एकत्र आणते, असे त्यांनी म्हटले. गणेश चतुर्थी साजरी करणाऱ्या सर्वांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान, मुंबईत उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानीही गणेशपूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडसह मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावल्याने अंबानी निवासस्थानी सेलिब्रिटींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अभिनेता सलमान खान तसेच विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासह अनेक कलाकार गणेशदर्शनासाठी अंबानी यांच्या घरी पोहोचले होते.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भगवान श्रीगणेश सर्वांवर कृपादृष्टी ठेवो, अशी प्रार्थना केली.
पीयूष गोयल यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. आपल्या निवासस्थानी आयोजित गणपतीपूजनावेळी पंतप्रधानांचे सान्निध्य मिळणे हे आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी मोठे सौभाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. विघ्नहर्ता भगवान श्रीगणेश यांनी प्रत्येकाच्या आयुष्यातील अडचणी दूर करून सर्वांवर आशीर्वाद ठेवावा आणि भारताने विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करावी, अशी प्रार्थनाही गोयल यांनी केली.