अलर्ट जारी! मुसळधार पावसाचा अंदाज

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
मुंबई
heavy rains राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. अनेक भागांत पावसाअभावी शेतीची कामे आणि पिकांची स्थिती अडचणीत आली होती. मात्र गणरायाच्या आगमनासोबत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अद्यापही काही जिल्हे चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना, आता राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 

Heavy rain forecast Farmers were worried after heavy rains 
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यातील आगामी पावसाबाबत नवा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, १४ सप्टेंबरपासून १९ सप्टेंबरपर्यंत राज्यात पाऊस पडेल; मात्र त्याचे स्वरूप प्रामुख्याने विखुरलेले राहण्याची शक्यता आहे. काही भागांत पाऊस होईल, तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम राहू शकते. या काळात दुपारपर्यंत उन्हाचे वातावरण राहून सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे डख यांनी म्हटले आहे.मुंबई आणि नाशिक या दोन जिल्ह्यांत या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर पालघर, ठाणे आणि पुणे जिल्ह्यांतही जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर दमदार राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सर्वदूर समान राहणार नसून तो विखुरलेल्या स्वरूपातच पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. विशेषतः मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, बीड, परभणी, धाराशिव, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना पुढील आठवड्यात मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले आहे.राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांचे लक्ष या अंदाजाकडे लागले आहे. आगामी काळात पावसाने जोरदार हजेरी लावल्यास पिकांना मोठा आधार मिळण्याची अपेक्षा आहे. यंदा राज्यात परतीचा पाऊसही जोरदार होईल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रातील पावसाची स्थिती कशी राहते, याकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.