अनिल कांबळे
नागपूर,
hookah parlour रामनगर परिसरात कॅफेच्या नावाखाली बेकायदेशीरपणे चालणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पार्लर चालक, वेटर आणि तीन ग्राहकांसह एकूण ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कॅफेच्या मालकाच्या मोबाईलचा सीडीआर काढल्यास काही वसुलीबहाद्दर पोलिस कर्मचाऱ्यांची नावे समोर येऊ शकतात, अशी चर्चा आहे.

माहितीनुसार, रामनगर येथील सोरो कॅफेमध्ये ग्राहकांना बेकायदेशीरपणे प्रतिबंधित हुक्का पुरवला जात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस पथकाने कॅफेवर छापा टाकला. छाप्यादरम्यान हुक्का पार्लर चालक ज्ञानेश्वर गणपती पवनीकर (३२, जगन्नाथ बुधवारी, तहसील) हा वेटर सचिन गोपीचंद कावळे (२८, त्रिमूर्तीनगर) याच्या मदतीने ग्राहक महेंद्र विवेक आगलावे (३२, नवाबपुरा, महाल), प्रणय सतीश लोंढे (२२, सुदामनगर) आणि गौरव नरेंद्र खंडारे (३०, बोरगाव चौक, गिट्टीखदान) यांना शासनाने बंदी घातलेला तंबाखूजन्य हुक्का सेवनासाठी पुरवत असताना आढळून आले. आरोपी कोणत्याही परवान्याशिवाय स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे हे हुक्का पार्लर चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरून हुक्का पॉट, विविध फ्लेव्हरची तंबाखू आणि इतर साहित्य असा एकूण २ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कॅफे मालक, वेटर आणि तिन्ही ग्राहकांविरुद्ध अंबाझरी पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.