पोलिसांची अवैध धंद्याविरोधात कारवाई

एकाच आठवड्यात १५३ आरोपींना अटक

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
बुलढाणा
illegal-activities आगामी महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी बुलढाणा पोलीस शन मोडमध्ये आले आहेत. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवून तीव्र कारवाईचा तडाखा देण्यात आला आहे. गेल्या एका आठवड्यात पोलिसांनी विविध कारवायांमध्ये तब्बल १०५ गुन्हे दाखल करत १५३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच २ कोटी १५ लाख ६७हजार ३७० रुपयांचा २ कोटी १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
tambe
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गेल्या आठवड्यात खालीलप्रमाणे धडक कारवाया करण्यात आल्या आहेत. अवैध देशी-विदेशी दारू आणि गावरान हातभट्टीविरुद्ध ७६ केसेस नोंदवून ७६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३ लाख ९२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जुगार कायद्यांतर्गत २१ केसेस करून ६३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून २ लाख ९९ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
आर्म अ‍ॅटअंतर्गत २ केसेसमध्ये ४ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १ पिस्तूल, १ मॅगझीन, १ चाकू, १ कोयता, २ मोटरसायकली आणि १ मोबाईल असा एकूण १,८६,३०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अवैधपणे गांजा बाळगणार्‍यांविरोधात २ केसेस दाखल करून २ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५८ हजार ५०० रुपये किमतीचा १.१७० कि.ग्रॅ. गांजा जप्त करण्यात आला. अवैध गौण खनिज व रेती वाहतुकीविरुद्ध ४ केसेसमध्ये ८ आरोपींना ताब्यात घेऊन वाहनांसह २ कोटी ६ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यात आगामी सण शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत. अवैध धंदे करणार्‍यांवर यापुढेही अशीच कडक आणि कठोर कायदेशीर कारवाई सतत सुरू राहील असा इशारा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे.