भारत-पाक पुन्हा आमनेसामने!

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
चंदीगड,
india pak face to face again भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा क्रीडांगणावर आमनेसामने येणार आहेत. यावेळी दोन्ही संघांमधील सामना हॉकीच्या मैदानावर होणार असून, विशेष म्हणजे ही लढत भारतीय भूमीवर रंगणार आहे. पंजाबमध्ये २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना १ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.
 
india pak face to face again
 
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हॉकी इंडियाच्या माहितीनुसार, यजमान आणि गतविजेता भारतासह पाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, चीन आणि जपान या सहा संघांचा मुख्य स्पर्धेत समावेश आहे. ओमान आणि बांगलादेश यांना राखीव संघ म्हणून ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील सामने जालंधर येथील ऑलिम्पियन सुरजित सिंग हॉकी स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत, तर बाद फेरीचे सामने मोहालीतील ऑलिम्पियन बलबीर सिंग सिनियर इंटरनॅशनल हॉकी स्टेडियममध्ये होणार आहेत. जालंधरमध्ये २ नोव्हेंबरपर्यंत गटातील सामने होतील आणि उद्घाटन सोहळाही याच ठिकाणी पार पडणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने आणि ५ नोव्हेंबरला अंतिम सामना मोहालीत खेळवला जाईल.
 
भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता वाढलेली असतानाच पाकिस्तानच्या सहभागाबाबत एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष मोहिउद्दीन अहमद वानी यांनी १४ सप्टेंबर रोजी सांगितले की, पाकिस्तानचा भारत दौरा हा सरकारच्या मंजुरीवर अवलंबून आहे. सरकारकडून मिळणाऱ्या निर्देशांनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे १ नोव्हेंबरच्या या सामन्यासाठी पाकिस्तान संघ भारतात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन २०११ पासून केले जात आहे. या स्पर्धेवर भारताचे वर्चस्व राहिले असून भारतीय संघाने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. भारताने सलग दोन वेळा ही ट्रॉफी जिंकली असून, यंदा सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी त्यांच्यासमोर आहे. पाकिस्ताननेही या स्पर्धेचे विजेतेपद तीन वेळा मिळवले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यासह संपूर्ण स्पर्धेकडे हॉकी चाहत्यांचे लक्ष असणार आहे.