मुंबई
mahavitaran दर महिन्याला घरात येणारं वीज बिल अनेकजण शेवटच्या तारखेपर्यंत भरत नाहीत. काही वेळा कामाच्या गडबडीत बिलाची तारीख लक्षात राहत नाही, तर काही जण पुढच्या महिन्यात भरू असा विचार करून बिल थकवतात. मात्र, वीज बिलाची थकबाकी वाढवत राहणं ग्राहकांच्या अडचणीत भर घालू शकतं. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी थकीत बिलाबाबत नियम स्पष्ट आहेत.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या 2026 मधील वीजपुरवठा नियमांनुसार, बिलाची रक्कम ठरलेल्या मुदतीत भरली नाही तर विलंब शुल्क लागू होऊ शकतं. तसेच थकबाकी कायम राहिल्यास नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.
बिलाची तारीख चुकवणं पडू शकतं महागात
वीज बिलावर ग्राहकाला देय तारीख स्पष्टपणे दिलेली असते. त्या तारखेपर्यंत बिलाचा भरणा न झाल्यास थकबाकीवर विलंब शुल्क आकारलं जाऊ शकतं. त्यामुळे केवळ मूळ बिलाची रक्कमच नाही, तर उशिराने भरताना अतिरिक्त रक्कमही द्यावी लागू शकते.
महावितरणच्या ऑनलाइन बिल प्रणालीमध्ये बिलाची रक्कम, देय तारीख आणि उशिराने भरल्यास लागणारी रक्कम पाहता येते. त्यामुळे बिल आल्यानंतर ते तपासून वेळेत पेमेंट करणं ग्राहकांसाठी फायदेशीर ठरतं.
थकबाकी राहिली तर काय?
वीज बिलाची थकबाकी भरली नाही म्हणून लगेच कोणत्याही क्षणी वीज कापली जाते, असं नाही. नियमानुसार ग्राहकाला आवश्यक नोटीस आणि भरण्यासाठी मुदत देण्याची तरतूद आहे. त्यानंतरही थकबाकी कायम राहिल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाऊ शकते.
नव्या वीजपुरवठा नियमांनुसार बिलाची देय तारीख संपल्यानंतर थकबाकी असल्यास, पुरवठा खंडित करण्यापूर्वी किमान 15 दिवसांची लेखी नोटीस देण्याची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी आलेल्या नोटिसांकडे दुर्लक्ष न करता थकबाकी वेळेत भरावी.
वीज कापली गेली तर पुन्हा जोडणीसाठी?
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर केवळ मूळ बिल भरून काम संपत नाही. परिस्थितीनुसार थकीत रक्कम, लागू शुल्क आणि पुनर्जोडणीशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते. महावितरणकडे यासाठी स्वतंत्र ऑनलाइन reconnection सेवा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी बिल थकवून नंतर मोठी रक्कम एकत्र भरण्यापेक्षा प्रत्येक महिन्याचे बिल देय तारखेपूर्वी भरण्याची सवय ठेवणं योग्य ठरेल.