मोबाईल टॉवरवर चढून युवकाची चार तास विरुगीरी

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
man on tower सिव्हिल लाइन्स येथील आमदार निवासाजवळील अहिंसा चौकात एका २० वर्षीय तरुणाने मोबाइल टॉवरवर अचानक चढून चार तास प्रशासनाला वेठीस धरले. टॉवरवर चढल्यानंतर तरुण जोरजोरात ओरडत असल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस आणि महापालिका अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर तरुणाला सुखरूप खाली उतरविण्यात यश आले. ही घटना आज घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) दुपारी बारा वाजता घडली.

tower
किशोर उर्फ सोनू नरसन सिन्हा (२०, मूळ रा. बोरतारा, नातोड, छत्तीसगड) असे या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले. मंगळवारी सकाळी बाराच्या सुमारास तो अहिंसा चौकातील मोबाइल टॉवरवर चढला. त्यानंतर तो मोठमोठ्याने ओरडू लागला. हा प्रकार लक्षात येताच प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ पोलिस आणि महापालिका अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच महापालिकेच्या सिव्हिल लाइन्स अग्निशमन केंद्राच्या तीन वाहनांसह पथक घटनास्थळी पोहोचले. अंबाझरी पोलिसांचे पथकही तेथे दाखल झाले. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. अग्निशमन दलाच्या टीडीआर मशीनच्या मदतीने अधिकारी टॉवरजवळ पोहोचले आणि पोलिस व अग्निशमन अधिकाऱ्यांनी तरुणाची समजूत काढण्यास सुरुवात केली. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी किशोरला समजावून सुरक्षितपणे टॉवरवरून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याचे आईवडिल मरण पावले असून त्याचा भाऊ रायपूरला राहतो. त्याला माहिती देण्यात आली असून तो भावाला घेण्यासाठी रवाना झाला आहे. या प्रकरणी सीताबर्डीचे ठाणेदार सुहास राऊत मात्र या घटनेचे गांभीर्य न समजता माध्यमांना माहिती देण्यासाठी मुद्दामून टाळाटाळ करीत असल्याचे दिसले.

बघ्यांची गर्दी आणि पोलिसांची तारांबळ
किशोर मोबाईलवर टॉवरवर चढून मोठमोठ्याने ओरडू लागल्याने अनेकांचे लक्ष त्याकडे गेले. तासाभरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यामुळे पोलिस लगबगीने घटनास्थळावर पोहचले. मात्र, पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. त्याला खाली उतरविण्यासाठी पोलिसांनी विनवण्या केल्या तरीही तो युवक खाली उतरायला तयार नव्हता. त्यामुळे चार तास त्या युवकाने प्रशासनाला वेठीस धरले होते.