जालना
manoj jarange मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या मुंबईकडे होणाऱ्या या प्रस्थानामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली असून, यावेळी सरकारने त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी दोन वेळा सरकारकडून आश्वासने देऊन त्यांना परत पाठवण्यात आले; मात्र यावेळी सरकारची चूक पदरात घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
सरकारकडून असलेल्या अपेक्षांबाबत बोलताना सौमित्रा जरांगे म्हणाल्या की, यावेळी सरकारने निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. यापूर्वी दोन वेळा मनोज जरांगे मुंबईत आले आणि त्यांना पुन्हा परत पाठवण्यात आले. मात्र, यावेळी किमान त्यांना परत पाठवले जाऊ नये. सरकारने नेमके काय दिले आहे, हे स्पष्टपणे सांगायला हवे. ‘दिलं, दिलं’ असे केवळ माध्यमांमधून सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात काय निर्णय घेतला आहे, हे सरकारने स्पष्ट केलेले नाही, असे त्यांनी नमूद केले.
मनोज जरांगे मुंबईत पोहोचल्यानंतर काही अघटित घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही सौमित्रा जरांगे यांनी दिला. त्यांच्या जीवाला काही झाले, तर त्याची झळ त्यांच्या मुलांसह संपूर्ण मराठा समाजाच्या कुटुंबांना लागेल, असे त्या म्हणाल्या. सलग १८ दिवस उपोषण सुरू असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांना मोठी चिंता आहे. एवढ्या काळापर्यंत अन्न-पाण्याविना राहणे शक्य नसतानाही १८ दिवसांपासून उपोषण सुरू आहे, मग सरकारला त्याची जाणीव होत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एखाद्या व्यक्तीकडून एक-दोन वेळा चूक झाली तर ती समजून घेता येते आणि चूक पदरातही घेता येते. मात्र, यावेळी सरकारची चूक आम्ही पदरात घेणार नाही, असे सौमित्रा जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मुंबईकडे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मुलींनीही माध्यमांशी संवाद साधताना सरकारला त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. मनोज जरांगे गेल्या १८ दिवसांपासून उपाशी आहेत. त्यांना काही झाल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या जीवाला काही झाले तर महाराष्ट्रातील मराठा समाजाचा संताप मोठ्या प्रमाणात उसळेल आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला संदेश देताना जरांगे यांच्या मुलीने मराठा समाज सध्या संतप्त असल्याचे सांगितले. मनोज जरांगे स्वतःही आक्रमक भूमिकेत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेताना गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन तिने केले. मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारचा निर्णय काय आहे, हे स्पष्टपणे सांगावे. जसे एखाद्याला उमेदवारीचे तिकीट देताना ‘तुला देणार नाही’ असे स्पष्ट सांगितले जाते, त्याचप्रमाणे मराठा समाजाला सरकारने आरक्षण देणार नसल्याचे स्पष्ट सांगावे; त्यानंतर समाज आपल्या पद्धतीने निर्णय घेईल, असेही तिने सुनावले.मनोज जरांगे यांच्याशी शेवटचे कधी बोलणे झाले, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांच्या मुलीने सुमारे एक महिन्यापासून वडिलांशी बोलणे झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे एकीकडे १८ दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता वाढलेली असताना दुसरीकडे त्यांच्या मुंबईकडे होणाऱ्या प्रस्थानामुळे कुटुंबीयांनी सरकारवर थेट जबाबदारी निश्चित केली आहे. आता सरकार मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि पुढील आंदोलनाची दिशा काय ठरते, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.